संगमनेरात धक्कादायक घटना! जरा जपून आपल्या सोबत देखील घडू शकते, प्रसाद दिला अन…
Breaking News | Sangamner Fraud Crime: चंदनापुरी घाटाजवळ एका ६८ वर्षीय व्यक्तीची मंगळवारी फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली.
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटाजवळ एका ६८ वर्षीय व्यक्तीची मंगळवारी फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रसाद देण्याच्या बहाण्याने अनोळखी इसमांनी एका वृद्धाकडून दोन सोन्याच्या अंगठ्या हातचलाखीने काढून घेतल्या. या अंगठ्यांची अंदाजे किंमत ६०,००० रुपये आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनकर विठोबा दिघे (वय ६८, रा. जोर्वे, ता. संगमनेर) हे २३ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी २:०० वाजता त्यांच्या मोटारसायकलवरून बाळेश्वरहून जोर्वे येथे परत येत होते. चंदनापुरी घाटाखालील ढगाडी मंदिराजवळ दोन अनोळखी तरुणांनी त्यांना थांबवले.
या दोन्ही आरोपींनी दिघे यांचा विश्वास संपादन करून, हा प्रसाद देवाला द्या, असे सांगत त्यांच्याकडील सोन्याच्या अंगठ्या प्रसादाला लावण्यासाठी मागितल्या. दिघे यांनी त्यांच्याजवळील प्रत्येकी नऊ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या (एक हिरव्या खड्याची आणि दुसरी पांढऱ्या खड्याची त्यांना दिल्या.
आरोपींनी हातचलाखीने अंगठ्या स्वतःकडे ठेवून त्याऐवजी कागदी पुडीमध्ये दगड बांधून दिघे यांना परत दिल्या. त्यानंतर काही वेळाने दिघे यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले, तेव्हा त्यांनी तत्काळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी दिघे यांच्या तक्रारीनुसार भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४) आणि ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक एस. एस. पाटोळे करत आहेत. आरोपींचा शोध सुरू असून, या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.
दरम्यान अनोळखी व्यक्तीला बळी पडू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
Breaking News: A 68-year-old man was cheated near the ghat