संगमनेर: पुणे-नाशिक महामार्गावर टेम्पो-कारचा भीषण अपघात, महिला ठार
Breaking News | Sangamner Accident: टेम्पो आणि कार यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.
संगमनेर: तालुक्यातील चंदनापुरी येथील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी (दि.25) दुपारी टेम्पो आणि कार यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून चारजण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे पुन्हा एकदा चंदनापुरी परिसरात एकाच पदरावरुन निष्काळजीपणे सुरू असलेल्या दुहेरी वाहतुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याबाबत डोळासणे महामार्ग पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की लता रमेश काळे (वय 40), राजेंद्र बाळू रुपनर (वय 38), संजय बाळू रुपनर (वय 37), आरुष राजेंद्र रुपनर (वय 11) व सुभद्रा बाळू रुपनर (वय 55) हे सर्वजण कर्जत तालुक्यातील बजरंगवाडी येथील रहिवासी असून बुधवारी (दि.24) नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे देवदर्शनासाठी कारमधून गेले होते. देवदर्शन आटोपून गुरुवारी ते पुणेच्या दिशेने परत येत असताना चंदनापुरी शिवारात कार आणि टेम्पो यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला.
अपघात इतका भयाण होता की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेत मदतकार्य सुरू केले. डोळासणे महामार्ग पोलीस उपनिरीक्षक शशिकांत वाघमारे, पोलीस हेडकॉन्स्टेबल अजयकुमार आठरे, पोलीस नाईक भागा धिंदळे, सागर दुसिंगे व नितीन सानप यांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने कारमधील जखमींना बाहेर काढले. तत्काळ रुग्णवाहिकेद्वारे जखमींना संगमनेर येथील कुटे रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या अपघातात लता काळे या महिलेचा मृत्यू झाला असून इतर चारजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका अकरावर्षीय चिमुकल्याचाही समावेश आहे, अपघाताच्या ठिकाणी पुणे-नाशिक महामार्गावर सध्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू असून त्यामुळे एकाच पदरावरून दुहेरी वाहतूक सुरू आहे. हीच अकार्यक्षम वाहतूक व्यवस्था अपघाताचे मुख्य कारण ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या मार्गावर गेल्या काही काळात वारंवार अपघात होत असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र तरीही प्रशासनाकडून यावर ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाही.
Breaking News: Woman killed in tempo-car accident on Pune-Nashik highway