अहिल्यानगर: पोलिसांवर हल्ला; दहा जणांविरोधात गुन्हा दाखल
Breaking News | Ahilyanagar: जमीन हद्द कायम मोजणीसाठी गेलेल्या पोलिस व भुमी अभिलेख अधिकाऱ्यांवर गावकऱ्यांनी हल्ला करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याची गंभीर घटना.
पाथर्डी: तालुक्यातील टाकळी फाटा शेकटे शिवार येथे जमीन हद्द कायम मोजणीसाठी गेलेल्या पोलिस व भुमी अभिलेख अधिकाऱ्यांवर गावकऱ्यांनी हल्ला करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याची गंभीर घटना गुरुवारी (दि. २५) सप्टेंबर रोजी दुपारी घडली. या प्रकरणी दहा जणांविरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, पोलीस हेडकॉन्स्टेबल अलताफ अहमद शेख व मोजणी अधिकारी साहील अनिल शेळके यांच्यासह पथक दुपारी शेकटे शिवारात मोजणीसाठी गेले असता सिंधुबाई पंढरीनाथ घुले, वसंत पंढरीनाथ घुले, प्रयागा वसंत घुले, तुळशिराम पंढरीनाथ घुले, अनिता तुळशिराम घुले, गणेश वसंत घुले, कार्तीक वसंत घुले, साईनाथ तुळशिराम घुले, नवनाथ तुळशिराम घुले व शिवनाथ रामभाऊ घुले (सर्व रा. शेकटे) यांनी सरकारी मोजणीस विरोध करून अधिकाऱ्यांना अडथळा निर्माण केला.
या वेळी कार्तीक वसंत घुले याने हातातील लाकडी काठीने पोहेकॉ शेख यांच्या हातावर मारहाण केली, तर वसंत पंढरीनाथ घुले याने काठी हिसकावून त्यांच्या पायावर वार केला. प्रयागा वसंत घुले हिने फिर्यादीची कचांडी धरून चापट मारली. इतर आरोपींनी पोलिस अंमलदार व मोजणी अधिकाऱ्यांनाही धक्काबुक्की व शिवीगाळ केली.
दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर घटनास्थळी पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप कानडे व अशोक बडे आले असता त्यांनाही आरोपींनी धक्काबुक्की केली.सरकारी कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांवर हात उचलणे ही अत्यंत निंदनीय व कायद्याला धाब्यावर बसवणारी कृती आहे.लोकशाही व्यवस्थेत प्रश्न सोडविण्यासाठी न्यायालयाचा मार्ग असताना पोलिसंवर हल्ला करणे हा कायद्याचा अवमान असून समाजासाठी धोकादायक संदेश देणारा प्रकार आहे.
या प्रकरणी फिर्याद दाखल करण्यात आली असून, आरोपींवर सरकारी कामात अडथळा, मारहाण, दमदाटी यांसह संबंधित कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे करीत आहेत.
Breaking News: Attack on police Case registered against ten people