अहिल्यानगर: जिल्ह्यातील 9 तालुक्यांत पावसाचा अक्षरशः धुमाकूळच, बचाव कार्यासाठी हेलिकॉप्टर
Breaking News | Ahilyanagar Flood: नगर, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर या नऊ तालुक्यांत अतिमुसळधार पावसाने हाहाकार माजवला. अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली.
अहिल्यानगर: शनिवारी दुपारनंतर व रात्री ते रविवारी सकाळपर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाने अक्षरशः धुमाकूळच घातला. नगर, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर या नऊ तालुक्यांत अतिमुसळधार पावसाने हाहाकार माजवला. अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटला, तसेच रस्ते वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. अतिवृष्टीने शेतकरी कोलमडला असून मोठं नुकसान झालं आहे. अतिवृष्टीने उभ्या पिकांचा अक्षरश: चिखल झाला आहे. शेतकर्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावला गेला असून काढणीला आलेली पिकं गुडघाभर पाण्यात आहेत. पाऊस थांबला असलातरी शेतांना अद्यापही तळ्याचे स्वरूप प्राप्त झालेले असून शेतकर्यांच्या डोळ्यादेखत होत्याचे नव्हते झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. एकट्या राहाता तालुक्यातच 150 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याखालोखाल नेवासा तालुक्यात 119.9 मिलीमीटर पाऊस एकाच दिवशी झाला आहे.
दरम्यान, पाणलोटामध्ये तुफान पाऊस होत असल्याने भंडारदरा आणि निळवंडेतून विसर्ग वाढविण्यात आला आहे. भंडारदरातून 13764 क्युसेक तर निळवंडेतून 17199 क्युसेक पाणी सोडण्यात येत होते. तसेच अन्य भागातून पाणी येत असून नदीतील पाणी जवळपास 20 हजार क्युसेकच्या पुढे गेले आहे. त्यामुळे प्रवरा नदीला पूर आला आहे. नाशिक जिल्ह्यातही धो-धो पाऊस कोसळत असल्याने नांदूर मधमेश्वर बंधार्यातून रात्री 9 वाजता 87 हजार 579 क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. पाऊस सुरु असल्याने पाणी वाढण्याची शक्यता आहे. तसेच नाशिक, नगर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने रात्री 10 वाजता जायकवाडी धरणातून 3 लाख 1 हजार 824 क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते.
शेवगाव तालुक्यात नागरिकांच्या बचाव कार्यासाठी हेलिकॉप्टरची तर नगरमध्ये बोटींचा वापर करण्यात आला.
या पावसात नेवासा तालुक्यात व जामखेड तालुक्यात अंगावर भिंत पडून प्रत्येकी एक या प्रमाणे दोन महिला तर राहाता तालुक्यात दोघे पुराच्या पाण्यात बेपत्ता आहेत. यामुळे शनिवारच्या पावसात पाच बळी गेले आहेत. नगर शहर आणि तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नगरच्या सीना नदीला चौथ्यांदा पूर आला. या पूराच्या पाण्याची व्याप्ती नगर शहरातील नालेगाव अमरधामपर्यंत पोहचली. यामुळे नेप्ती नाका आणि नालेगावचा पूर्वकडील भाग हा पूराच्या पाण्याने व्यापला होता. अखेर एनडीआरएफच्या जवानासह नगर महानगर पालिकेच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न करून या भागातील पूरातील पाण्यात अडकलेल्या कुटूंबाला बाहेर काढले.
जिल्ह्यात शनिवारी रात्री झालेल्या पावसात नऊ तालुक्यातील सर्व मंडलासह पारनेर व श्रीगोंद्यातील काही मंडल अशा 83 मंडलामध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सर्वच जिल्ह्यात पाणी-पाणीच झाले होते. काही तालुक्यात रविवारी सकाळपर्यंत पाऊस कोसळत होता. जिल्ह्याच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदा एवढ्या मोठा प्रमाणावर पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील अनेक भागात गेल्या 10 ते 12 दिवसांपासून सलग पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेवगाव, पाथर्डी, जामखेड, कर्जत व अहिल्यानगर या पाच तालुक्यात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात अतिवृष्टी शनिवारीच्या पावसाने झाली आहे. तब्बल 81.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुकानिहाय शनिवारीचा पाऊस(आकडेवारी मिलीमीटरमध्ये) अहिल्यानगर 91.9, जामखेड 92.5, शेवगाव 89.3, पाथर्डी 93.9 नेवासा 119.9 मिलीमीटर, राहुरी 85.6, कोपरगाव 113.2, श्रीरामपूर 102.8, राहाता 150.8, पारनेर 58.2, श्रीगोंदा 49.4, कर्जत 60.6, संगमनेर 51.6, अकोले 41.9. दरम्यान, तालुक्याच्या इतिहासात प्रथमच देवटाकळी येथे पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी हेलिकॉप्टर दाखल होतेे. मात्र बचाव कार्यात अडचणी आल्याने ते मागे परतले.
Breaking News: Literally a torrential downpour in 9 talukas of the Ahilyanagar