बोटा, घारगाव परिसरात पुन्हा भूकंपाचे धक्के; १५ दिवसांत दुसरा धक्का; नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण
Breaking News | Sangamner: सकाळी ११ वाजून ५७ मिनिटांनी पुन्हा भूकंपाचे धक्के.
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील बोटा, घारगाव परिसरात सोमवारी (दि.२९) सकाळी ११ वाजून ५७ मिनिटांनी पुन्हा भूकंपाचे धक्के बसले. अकलापूर परिसरात घरातील भांडे पडली. आवाज झाल्याचे ऐकून ग्रामस्थ रस्त्यावर आले. त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
१५ दिवसांपूर्वी झालेल्या भूकंपाची नोंद नाशिक येथील मेरी संस्थेच्या भूकंप मापन यंत्रात झाली होती. त्याची तीव्रता २.४ रिश्टर स्केल असल्याची माहिती वरीष्ठ भू-वैज्ञानिक चारुलता चौधरी यांनी दिली होती. आज पुन्हा धक्के जाणवले. अकलापूर गावात १२ वाजताच्या दरम्यान मोठा आवाज झाला. हादरा बसल्याने घरातील भांडे जमिनीवर पडले असल्याचे सचिन तळेकर यांनी सांगितले.
यापूर्वी संगमनेर तालुक्यातील पठार भागातील घारगाव, बोटा, माहुली, नांदूर खंदरमाळ, बोरबन, कोठे, अकलापूर आदी परिसरात भूकंपाचे धक्के बसले होते. नाशिकच्या ‘मेरी’ संस्थेत त्याची नोंद झाली होती.
घारगाव, बोटा परिसरातील गावांमध्ये वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. सौम्य धक्के असल्याने या धक्क्यांमध्ये कोणतेही नुकसान झालेले नाही. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. संबधित प्रशासनाने धक्क्यांची तीव्रता व कारणांचा तपास करावा.
Breaking News: Earthquake tremors again felt in Bota, Ghargaon area