Home नाशिक नाशिक हादरलं! खंडणीच्या वादातून बारमध्ये गोळीबार

नाशिक हादरलं! खंडणीच्या वादातून बारमध्ये गोळीबार

Breaking News | Nashik Crime: पोलीस ठाण्याच्या हद्दीत थेट कायद्यालाच आव्हान देत शनिवारी रात्री उशिरा गोळीबाराची घटना.

Shooting in bar over extortion dispute

नाशिक: सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत थेट कायद्यालाच आव्हान देत शनिवारी रात्री उशिरा गोळीबाराची घटना घडली. बिअरबारमध्ये झालेल्या वादातून एकावर थेट गोळी झाडण्यात आली. विजय तिवारी (वय 20) या तरुणाच्या मांडीत गोळी घुसली असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही थरारक घटना रात्री उशिरा सुरू असलेल्या बिअरबारसमोरच घडली. विशेष म्हणजे, ही घटना पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणि पोलिसांच्या डोळ्यासमोर घडल्याने सातपूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. या प्रकरणी माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांचा मुलगा भूषण लोंढे याच्यासह आठ ओळखीचे आणि चार अज्ञात अशा एकूण 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, अन्य संशयित आरोपींचा शोध सुरू आहे. जखमी विजय तिवारी याच्यावर रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडल्याचा आरोप शुभम पाटील उर्फ भुऱ्या याच्यावर आहे, तर प्रिन्स सिंग याने चाकूने हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. अटकेतील भूषण पाटील, दुर्गेश वाघमारे व आकाश उर्फ अभिजित डांगळे या तिघांची नावे समोर आली असून, भूषण पाटील याच्यावर यापूर्वीही दोन गुन्हे दाखल असल्याचे समजते.

या घटनेप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर भडांगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भूषण लोंढे, शुभम पाटील उर्फ भुऱ्या, प्रिन्स सिंग, दुर्गेश वाघमारे, आकाश उर्फ अभिजित डांगळे, राहुल गायकवाड सनी विठ्ठलकर, शुभम निकम, वेदांत चाळगे व इतर चार ते पाच अज्ञातांविरुद्ध खंडणीसाठी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेनंतर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, परिमंडळ-2 चे उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख आणि वरिष्ठ निरीक्षक प्रकाश अहिरे यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपींविरुद्ध ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, हॉटेलमध्ये दररोज होणारे भांडण मिटवण्यासाठी खंडणी रुपात भागीदारीची मागणी करण्यात आली होती. भूषण लोंढे याने बारमध्ये झालेल्या भांडणातून गोळीबार केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. खंडणी मागत गोळीबार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी दिली आहे.

Breaking News: Shooting in bar over extortion dispute

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here