Home अहिल्यानगर अहिल्यानगर: बिबट्याला पाहताच ऊसतोड मजुरांनी ठोकली धूम

अहिल्यानगर: बिबट्याला पाहताच ऊसतोड मजुरांनी ठोकली धूम

Breaking News | Ahilyanagar: ऊसतोड कामगारांना रविवारी सकाळी दहा वाजता बिबट्या दिसल्याने ऊसतोड मजुरांमध्येही एकच दहशत: टाकळी खातगाव परिसरात बिबट्याचा एक महिन्यापासून वावर : ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा.

Sugarcane harvesters create a stir after seeing a leopard

अहिल्यानगर : टाकळी खातगाव, नेप्ती, हिंगणगाव, इसळक, निंबळक, खारे कर्जुने, जखणगाव, हमीदपूर या भागांमध्ये गेल्या एक महिन्यापासून बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतकरीवर्ग धास्तावला आहे. टाकळी खातगाव परिसरामध्ये काही ऊसतोड कामगारांना रविवारी सकाळी दहा वाजता बिबट्या दिसल्याने ऊसतोड मजुरांमध्येही एकच दहशत पसरली आहे.

खारे कर्जुने, इसळक येथील लहान मुलावर झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच टाकळी खतगाव, नेप्ती या परिसरामध्ये ऊस क्षेत्र वाढल्याने बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दिवसाही शेतकरी आणि शेतमजूर यांच्यामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. जनावरांसाठी ऊस, मका, घास, चारा पिके घेण्यासाठी महिलांना शेतात जावे लागते. बिबट्याच्या भीतीने जनावरांचे हाल सुरू झाले असून, महिलावर्गामध्ये फक्त बिबट्याची चर्चा सुरू आहे. शाळेत पायी जाणाऱ्या मुले-मुली यांनाही मोटारसायकलवरून सोडवण्याची वेळ पालकांवर आली आहे. शाळेमध्ये उपस्थिती कमी प्रमाणात आढळत आहे.

वनविभागाशी वारंवार संपर्क करूनही त्यांची यंत्रणा कमी पडत असून, साधनांची कमतरता प्रकर्षाने जाणवत आहे. नगरच्या पश्चिम पट्ट्यामध्ये वनविभागाने तातडीने ड्रोन सर्वेक्षण करून बिबट्यांची संख्या निश्चित करावी व त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी टाकळी खातगावचे उपसरपंच सरपंच सुनीता नरवडे, सुनील नरवडे, राजाराम नरवडे, शिक्षक नेते नारायण पिसे, माजी सरपंच रा. वि. शिंदे, नारायण भापकर, गोरक्ष शिंदे, ज्ञानदेव शिंदे, बाबा नरवडे, दगडू नरवडे, प्राचार्य सुभाष नरवडे, संतोष नरवडे, पत्रकार रमेश शिंदे, गीताराम नरवडे, राजाराम शिंदे, सुदाम शिंदे, मच्छिंद्र जाधव यांनी केली आहे. बिबट्यांचा वेळीच बंदोबस्त न झाल्यास नगर-कल्याण महामार्गावर रास्ता रोको करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

सकाळी दिसला बिबट्या

रविवारी सकाळी दहा वाजता नारायण पिसे (रा. टाकळी खातगाव) यांचे गट नंबर ४०६ मध्ये ऊसतोड कामगारांना दोन बिबटे दिसले. बिबटे पाहताच ते भयभीत झाले. ऊसतोड थांबून घरी निघून गेले. यामुळे शेतीच्या कामाचा प्रश्न तयार झाला आहे. मजूर काम करण्यास धजावत नाहीत.

बिबट्यांचा जास्त वावर असलेली गावे

टाकळी, खातगाव, जखणगाव, हिंगणगाव नेप्ती, निमगाव वाघा, इसळक, निंबळक, खारे कर्जुने, निमगाव घाणा, दहावा मैल, हमीदपूर टाकळी खातगाव येथे संतोष नरवडे यांच्या शेतामध्ये रविवारी पिंजरा लावण्यात आला.

Breaking News: Sugarcane harvesters create a stir after seeing a leopard

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here