५ जणांकडून तरुणावर कोयत्याने वार, दगड डोक्यात घालून निघृण खून; कॉलेजजवळ धक्कादायक घटना
Breaking News | Pune Crime: ५ जणांच्या टोळक्याने २२ वर्षीय तरुणावर कोयत्याने सपासप वार करून आणि दगड घालून त्याचा निघृण खून.

धायरी : सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुक येथे एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास थरारणारी घटना घडली. ५ जणांच्या टोळक्याने २२ वर्षीय तरुणावर कोयत्याने सपासप वार करून आणि दगड घालून त्याचा निघृण खून केला. खुनाच्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे. तौकीर शेख (वय २२, रा. धनकवडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. खून झालेला तौकीर शेख याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
वडगाव बुद्रुक येथील सिंहगड कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मिनाक्षीपुरम येथील कृष्णकुंज इमारतीच्या पार्किंगमध्ये तौकीर शेख हा बसलेला असताना, दुपारी अडीचच्या सुमारास ५ हल्लेखोर तिथे आले. या हल्लेखोरांनी अचानक तौकीरवर कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या तौकीरवर त्यांनी त्यानंतर दगड घालून अत्यंत क्रूरपणे त्याचा खून केला. घटना घडल्यानंतर सर्व हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही सुरू केली आहे. खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Breaking News: 5 people brutally murdered a young man with a sickle
















































