अकोलेत आमदार लहामटे यांच्या निषेधार्थ रास्ता रोको, अकोल्याच्या इतिहासात प्रथमच
Breaking News | Akole: लिंगदेव येथील शेतकऱ्यास मारहाण प्रकरण; फौजदारी कारवाईची मागणी.

अकोले: तालुक्यातील लिंगदेव येथील बाळीबा होलगीर या शेतकऱ्याला आमदार डॉ. किरण लहामटे यांनी मारहाण केल्याच्या निषेधार्थ शहरातून जाणाऱ्या कोल्हार-घोटी मार्गावरील महात्मा फुले चौकात गुरुवारी (दि.२०) दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आमदारांनी होलगीर कुटुंबियांची माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. तर याप्रकरणी आमदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे यांनी केली. २०१९ ला आम्ही वर्गणी काढून निवडून दिले, त्यांना आता सत्ता आणि संपत्तीचा माज आला असल्याचा आरोपही त्यांनी केला. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दाद मागण्याचे सूतोवाच करण्यात आले. अकोल्याच्या इतिहासात प्रथमच आमदारांच्या विरोधात अशा स्वरूपाचे आंदोलन झाले.
अकोले तालुक्यातील लिंगदेव ग्रामस्थ, कानडी समाज व विविध पक्षीय कार्यकर्त्यांनी आदोलन करून आमदार लहामटे यांच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली. येत्या निवडणुकीत अशाप्रकारे शेतकऱ्यांना मारहाण करणाऱ्या आमदारांना मतदान न करण्याचे आचाहन आंदोलनकर्त्यांनी केले. दरम्यान, ऐन आठवडे बाजारच्या दिवशी या आंदोलनामुळे अकोले संगमनेर रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. भाजपचे मंडलाध्यक्ष राहुल देशमुख, बाळासाहेब सावंत, नगराध्यक्ष बाळासाहेब बडजे, लिंगदेवचे सरपंच अमित घोमल, रासपचे तालुकाध्यक्ष भगवान करवर, संपत घोडसरे, नामदेव घोडसरे, त्र्यंबक बेणके, भाऊसाहेब बेणके, काशिनाथ बेणके, पोपट बिन्नर, पोपट होलगीर, केरू बिन्नर, पोपट बिन्नर, चंद्रकांत गोंदके, भानुदास सदगीर, बबन सदगीर, स्वप्नील धांडे, पोपट चौधरी, एकनाथ बेणके, राहूल बेणके, मदन बिन्नर, पोपट सदगीर, दगडू सदगीर, रामहरी सदगीर, धोंडिबा सदगीर, पंडरी बेणके, सुतेश खांडगेल संदीप शेणकर आदी उपस्थित होते.
जिल्हा बँकेचे संचालक भांगरे म्हणाले, कानडी समाज अल्पसंख्याक असला तरी आम्ही या समाजातील अन्यायाविरोधात ताकद देऊ. बेलापूर, निळवंडे, खडकी व बिठा घाटात मारहाणीचे प्रकार घडले तर लिंगदेव येथे शेतकऱ्याला मारहाण केली जाते.
या प्रवृत्ती बळावू नये यासाठी व उन्मतखोरी करणाऱ्या प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. कानडी समाज सुधारक संघाचे प्रदेशाध्यक्ष बबन सदगीर यांनी सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला प्रश्न विचारला म्हणून आमदार दोन श्रीमुखात भडकावत असेल तर हा लोकशाहीचा गळा घोटून हुकूमशाही गाजविण्याचा प्रकार असून जोपर्यंत माफी मागितली जात नाही तोपर्यंत आंदोलने होत राहतील याची आमदारांनी दखल घ्यावी, असा इशारा दिला.
समशेरपूरचे उपसरपंच नितीन बेणके म्हणाले, सामान्य शेतकऱ्याला मारहाण केली तर हा माज कोठून येतो तर तो सत्तेतून येतो असे यापुढे होणार असेल तर जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा सर्व निवडणुकांमध्ये अपक्ष उमेदवारांना पाठबळ देऊन अशांना धडा शिकविण्याची गरज असल्याचे सांगितले. बी. जे. देशमुख म्हणाले, घटनेत तरतूद आहे की जनतेने
विडंबनात्मक कवितेने मिळविल्या टाळ्या
आमदार डॉ. किरण लहामटे यांनी मारहाण केलेल्या लिंगदेव येथील शेतकरी वाळीबा होलगीर यांनी कार्यक्रम संपल्यानंतर आमदारांना भेटायला गेलो, तेव्हा त्यांना काही सांगत असतानाच त्यांनी दोन कानफाडीत मारल्याचे सांगितले. तर शहापूर येथील सदगीर या कार्यकर्त्याने विडंबनात्मक कविता सादर केली. ‘रात्रीची बिबट्याची भीती आणि दिवसा आमदाराची भीती’ अशा आशयाची कविता सादर करत उपस्थितांच्या टाळ्या मिळविल्या.
लोकप्रतिनिधी मार्फत आपले प्रश्न सोडवायचे असतात. मात्र बाळीबा होलगीर यांनी प्रश्न विचारण्यापूर्वीच त्याच्या श्रीमुखात भडकावून त्याच्यावर अन्याय करणाऱ्या आमदारांनी नैतिकतेला धरून प्रथम माफी मागणे आवश्यक असताना तसे घडले नाही, त्यामुळे जनतेला रस्त्यावर उतरावे लागले. मात्र यापुढे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून हुकूमशाहीला आळा घालावा लागेल असे सांगितले. तर बाजीराव दराडे यांनी आमदार लहामटे व ज्या पुढाऱ्यांनी अॅट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल केले त्यांच्यावर देखील कारवाई होणे आवश्यक असल्याचे म्हणाले.
नगराध्यक्ष बडजे म्हणाले, माजी मंत्री स्वर्गीय मधुकर पिचड यांनी तालुक्याचे लोकप्रतिनिधीत्व सांभाळताना मंत्रिपदे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, राज्याचे विरोधी पक्षनेतेपद अशी प्रतिष्ठेची पदे भूषविली. मात्र त्यांनी कधीही सत्तेचा दुरुपयोग केला नाही. विरोधकांनी वेळोवेळी त्यांच्यावर टीका केली, त्यांच्यावर काळे ऑईल फेकले तरी देखील त्यांनी कार्यकर्त्यांना माफ केले होते हा इतिहास आहे. हाच आदर्श आमदारांनी घेणे आवश्यक आहे. शेतकऱ्याला मारहाण करणे हे निंदनीय आहे. शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख मारुती मेंगाळ म्हणाले, तालुक्यात शेतीमालाला भाव मिळावा यासाठी आंदोलने झाली. मात्र महाराष्ट्रात पहिली घटना आहे की आमदाराने शेतकऱ्याला मारहाण केल्याबद्दल शेतकऱ्यांना एकत्रित येत रस्त्यावर आंदोलन करावे लागत आहे. कार्यकर्त्यांनी आमदारांची बाजू घ्यावी, मात्र जिथे चुकत असेल तिथे सांगणेही आवश्यक आहे. आता लोकवर्गणी काढून जनतेने निवडून दिले ही जनतेची चूक झाली असेच म्हणावे लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष सुरेश गडाख, माजी सरपंच संपत नाईकवाडी, पोपट चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन लहानू सदगीर यांनी केले तर आभार माजी पंचायत समिती सदस्य राहुल बेणके यांनी मानले. पोलीस निरीक्षक मोहन बोरसे व नायब तहसीलदार लोहरे यांना निवेदन दिले.
Breaking News: Road blockade in Akole to protest against MLA Lahamte


















































