संगमनेर: नाशिक-पुणे महामार्गावर आयशर टेम्पो आणि बस यांच्यात भीषण अपघात
Breaking News | Sangamner Accident: अमृतवाहिनी कॉलेजजवळ आयशर टेम्पो आणि बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात टेम्पो चालक गंभीर जखमी.
संगमनेर: नाशिक-पुणे महामार्गावर अमृतवाहिनी कॉलेजजवळ आयशर टेम्पो आणि बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात टेम्पो चालक गंभीर जखमी झाला. या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात बस चालकाविरोधात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृतवाहिनी कॉलेज जवळ गुंजाळ शॉपीसमोर २३ मे रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला होता. या संदर्भात मंगळवारी अवधुत धोंडीबुवा भारती (वय ३५, रा. जाधववाडी, चाकण, ता. खेड, जि. पुणे, मूळ रा. हिप्परगा, पोस्ट हाडोली बी.एस., ता. कंधार, जि. नांदेड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते २३ मे रोजी पहाटे ४ वाजता आपला आयशर टेम्पो (क्र. एमएच ०५ डीके १६२५) घेऊन नाशिक-पुणे रोडने जात होते. त्यावेळी अमृतवाहिनी कॉलेजजवळ गुंजाळ शॉपीसमोर प्रभू तुकाराम लोखंडे (वय ५४, रा. कावलगाव, ता. पूर्णा, जि. परभणी, सध्या रा. तळेगाव माळेवाडी, जि. पुणे) यांनी त्यांच्या ताब्यातील बस (क्र. एमएच ०९ एफएल ००७) हयगयीने आणि भरधाव वेगात राँग साईडने चालवून फिर्यादीच्या टेम्पोला समोरून जोरदार धडक दिली.
या अपघातात अवधुत भारती यांना गंभीर दुखापत झाली असून, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच अपघातावेळी फिर्यादीचा मोबाईलही कुठेतरी पडून गहाळ झाला आहे. अवधुत भारती यांनी अपघातानंतर तातडीने ग्रामीण रुग्णालय घुलेवाडी, संगमनेर येथे आणि त्यानंतर वाय.सी.एम. हॉस्पिटल भोसरी, पुणे येथे उपचार घेतले. उपचारानंतर त्यांनी १० जून रोजी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली. अपघातानंतर औषधोपचार घेत असल्याने फिर्याद देण्यास विलंब झाल्याचे कारण त्यांनी सांगितले.
Breaking News: accident between Eicher tempo and bus on Nashik-Pune highway