एकुलत्या एक लेकीचा अंत; सायकलवरुन शाळेत जाताना विद्यार्थिनीला डम्परने चिरडलं, जागीच मृत्यू
Breaking News | Niphad Accident: चांदोरीकडे जाणाऱ्या डम्परने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनीला चिरडल्याची भीषण दुर्घटना.
निफाड : नाशिक-छत्रपती संभाजीनगर राज्य महामार्गावरील चांदोरीलगत नागापूर फाटा येथे चांदोरीकडे जाणाऱ्या डम्परने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनीला चिरडल्याची भीषण दुर्घटना घडली. (Accident) याच डम्परने दाम्पत्यासही धडक देत गंभीर जखमी केले. त्यामुळे रस्त्यावर उतरलेल्या संतप्त ग्रामस्थांनी सुमारे दोन तास महामार्ग रोखून धरला होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, नागापूर येथील सिद्धी मंगेश लुंगसे (वय १२) ही विद्यार्थिनी सोमवारी सकाळी पावणेदहा वाजता सायकलवरून चांदोरीतील शाळेत निघाली होती. त्यावेळी महामार्गावर नागापूर फाटा येथे रस्त्याच्या कडेला ती थांबली असताना तिला नाशिकच्या बाजूकडून चांदोरीकडे भरधाव जाणाऱ्या हायवा डम्परने (एमएच १५, एचएच ७५७८) जोरदार धडक दिली. या अपघातात डम्परच्या मागील चाकाखाली चिरडल्याने सिद्धीचा जागीच मृत्यू झाला. सिद्धीला चिरडल्यानंतर त्याच डम्परने महामार्गाच्या डाव्या बाजूने दुचाकीवरून जाणारे चांदोरी येथील विश्वनाथ जाधव आणि त्यांच्या पत्नीलाही धडक दिली. त्यात हे दाम्पत्य गंभीर जखमी झाले. या अपघातांनंतर डम्परचालक वाहन सोडून फरारी झाला. या अपघातांचे वृत्त समजताच नागापूर आणि चांदोरी येथील संतप्त ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले.
विद्यार्थिनीचा बळी घेऊन डम्परने दाम्पत्यालाही चिरडल्याने संतप्त नागरिकांनी महामार्गावरच ठिय्या मांडत तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे महामार्गावर पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अपघातास कारणीभूत डम्परचालकावर कठोर कारवाई व्हावी, नागापूर फाटा येथे गतिरोधक बसवून यामार्गे, तसेच गोदाकाठ भागात नियमित धावणाऱ्या हायवा डम्परच्या वेगावर नियंत्रण आणावे, नागापूर फाटा येथे ब्लिंकर बसवावेत आदी मागण्या संतप्त आंदोलकांकडून करण्यात आल्या.
Breaking News: accident in which a dumper crushed a school going student