भीषण अपघात, भरधाव कार थेट बंगल्यात घुसली; पाच जणांचा मृत्यू
Nashik Accident : कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही कार नाशिक-कळवण रस्त्यालगत कोल्हापूर फाट्याजवळ एका बंगल्यावर जाऊन आदळली. पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
नाशिक: नाशिकमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही कार नाशिक-कळवण रस्त्यालगत कोल्हापूर फाट्याजवळ एका बंगल्यावर जाऊन आदळली. ही दुर्घटना बुधवारी (दि. 4 जून) रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातात नामपूर व देवळा येथील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींवर नाशिकमधील रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे.
माहिती अशी की, नामपूर येथील भदाण कुटुंबीय नाशिकमध्ये नातेवाईकाच्या लग्नसमारंभासाठी गेले होते. समारंभ आटोपून सटाण्याकडे परतत असताना, कार (क्र. एमएच 41 बीई 5443) चालवणाऱ्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. यामुळे कार थेट विठोबा शंकर अहेर यांच्या बंगल्यावर जाऊन आदळली. धडक एवढी भीषण होती की बंगल्याबाहेर उभा असलेला सिमेंटचा खांबही वाकून गेला.
अपघातामध्ये शैला वसंत भदाण (62), त्यांची जाऊ सरला भालचंद्र भदाण (50), चालक खालिक मेहमूद पठाण (50) रा. नामपूर, ता. सटाणा तसेच माधवी मेतकर (32) आणि त्यांची मुलगी त्रिवेणी मेतकर (04) रा. देवळा हे जागीच ठार झाले. तर भालचंद्र भदाण (52) रा. नामपूर आणि उत्कर्ष मेतकर (12) रा. देवळा हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना कळवण उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर नाशिक येथे रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मृतांत शैला भदाण व माधवी मेतकर या मायलेकी असून, त्रिवेणी ही माधवी यांची मुलगी आहे. या अपघातामुळे भदाण आणि मेतकर कुटुंबीयावर शोककळा पसरली आहे.
Breaking News: accident, speeding car crashes into bungalow; five people die