Home अकोले भंडारदरा पाठोपाठ निळवंडेही भरले; मुळा धरणही…

भंडारदरा पाठोपाठ निळवंडेही भरले; मुळा धरणही…

Breaking News | Akole: निळवंडेचा पाणीसाठा 7 हजार 965 दलघफू (95.64 टक्के) झाला होता. तर सायंकाळी तो 8 हजार 232 दलघफू म्हणजे 98.85 टक्के झाला असल्याची माहिती निळवंडे धरणाचे उपअभियंता जे. एस. दारोळे यांनी दिली.

After Bhandardara, Nilwande also filled Mula Dam too

अकोले:  उत्तर नगर जिल्ह्याच्या दृष्टीने भंडारदरा खालोखाल महत्वपूर्ण असणारे निळवंडे धरणही गुरुवारी (दि.21) भरले. त्यामुळे धरण लाभक्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुळा, भंडारदरा धरणांच्या पाणलोटक्षेत्रात मागील दोन दिवस जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे चोवीस तासात भंडारदरा, निळवंडे व मुळा या तीनही मोठ्या धरणांमध्ये पाण्याची विक्रमी स्वरुपात आवक झाली. मुळा धरणाचा पाणीसाठा चोवीस तासांत पाच टक्क्यांपेक्षा अधिक वाढला. तर निळवंडे धरण ओव्हरफ्लो झाले. कालच भरलेल्या भंडारदरा धरणात सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत एक टीएमसीपेक्षा जास्त म्हणजे 1 हजार 123 दशलक्ष घनफूट नवीन पाणी आले. हे सर्व पाणी सोडून देण्यात आले. नवीन आलेले 1123 दलघफू पाणी अधिक धरण साठ्यातील 93 दलघफू पाणी असे 1216 दलघफू पाणी धरणातून बाहेर पडले. पावसाचा जोर कमी झाल्यामुळे भंडारदराचा विसर्ग सकाळी 8 हजार 993 क्युसेक तर सायंकाळी 3869 क्युसेकपर्यंत कमी करण्यात आला होता.

निळवंडे धरणात तब्बल 1 हजार 377 दलघफू नवीन पाणी आले. 601 दलघफू पाणी सोडून देण्यात आले. तर 776 दलघफू पाण्याची भर निळवंड्याच्या पाणीसाठ्यामध्ये पडली. त्यामुळे पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली. सकाळी निळवंडेचा पाणीसाठा 7 हजार 965 दलघफू (95.64 टक्के) झाला होता. तर सायंकाळी तो 8 हजार 232 दलघफू म्हणजे 98.85 टक्के झाला असल्याची माहिती निळवंडे धरणाचे उपअभियंता जे. एस. दारोळे यांनी दिली. दरम्यान, भंडारदर्‍याचा विसर्ग कमी झाल्यामुळे निळवंडे धरणात येणार्‍या पाण्याचे प्रमाणही आज कमी झाले. त्यामुळे निळवंडे धरणाचा नदीत सुरू असणारा विसर्ग आज 7 हजार 388 क्युसेकपर्यंत कमी करण्यात आला होता.

मुळा धरणही भरण्याच्या मार्गावर

बारा तासांत 1300 दलघफू पाणी दाखल, साठा 25000 दलघफूवर

कोतुळ: अकोले तालुक्यात पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने 26000 दलघफू क्षमतेच्या मुळा धरणात विक्रमी पाण्याची आवक झाल्याने काल सायंकाळी पाणीसाठा 24446 दलघफू झाला होता. आज हा पाणीसाठा 25000 दलघफूच्या वर जाणार आहे. सोमवार पासून पावसाने सुरुवात केली मंगळवारी रात्रभर पाऊस सुरू राहिला. बुधवारी आणि काल गुरुवारी देखील पावसाची संततधार सुरूच असल्याने मुळा नदीचा प्रवाह टिकून आहे. दोन दिवसातील संततधार पावसाने काल बारा तासांत मुळा नदीतून तब्बल एक टीएमसी पेक्षा अधिक पाणी वाहिले. काल बुधवारी(दि 20) बारा तासांत मुळा धरणात 1300 दशलक्ष घनफूट नवीन पाणी दाखल झाले

मंगळवारी रात्रभर सुरू असलेल्या संततधार पावसाने मुळा नदीला पूर आला होता. कोतुळ येथील मुळानदी काठावरील कोतुळेश्वर मंदिरात पुराचे पाणी शिरले आहे. मात्र काल पूर ओसरल्याने मंदिरात शिरलेले पाणी काही प्रमाणात कमी झाले.

काल गुरुवारी सकाळी 6 वाजता मुळा नदी पात्रतून मुळा धरणाकडे 9155 क्युसेस चा विसर्ग सुरू होता. सकाळी 9 वाजता 12041 क्युसेसचा विसर्ग तर सायंकाळी 6 वाजता 7667 क्युसेसचा विसर्ग सुरु होता. कोतुळ येथे काल सकाळी 12 मिमी पावसाची नोंद झाली.

काल गुरूवारी मुळा धरणात 24 तासांत तब्बल 1807 दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली 26 टीएमसी क्षमतेच्या मुळा धरणाचा पाणीसाठा 24 हजार 170 दशलक्ष घनफूट झाला होता. हा पाणीसाठा आज 25000 दलघफूच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

गोदावरीला 53288 क्युसेकने विसर्ग

राहाता: सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील संततधारेने नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून गोदावरीत जायकवाडीच्या दिशेने 53288 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. गोदावरी दुथडी भरुन वाहत आहे. मंगळवार आणि बुधवारी दिवसभर सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पावसाची संततधार होती. सर्वच धरणं तुडूंब भरली असल्याने पावसाचे नवीन येणारे पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. काल सायंकाळी 7 च्या आकडेवारी नुसार दारणा धरणातून 14556 क्युसेकने विसर्ग सुरु आहे.

गंगापूर मधून 5529 क्युसेक, मुकणेतून 1210 क्युसेक, वालदेवी 1050 क्युसेक, आळंदीतून 687 क्युसेक, भावली 1218 क्युसेक, भाम 3799 क्युसेक, वाकी 616 क्युसेक, कडवा 2340 क्युसेक, पालखेड 3192 क्युसेक असा विसर्ग सुरु आहे. हे सर्व पाणी खाली नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात दाखल होत असल्याने नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे. बुधवारी रात्री 12 वाजता या बंधार्‍यातून गोदावरीत 42383 क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत होता. पाण्याची आवक वाढल्याने काल सकाळी 6 वाजता हा विसर्ग 45766 क्युसेक ने सोडण्यात येत होता. दुपारी 12 वाजता हा विसर्ग 48921 क्युसेक वर नेण्यात आला. तर काल सायंकाळी 6 वाजेपर्यंत हा विसर्ग स्थिर होता. त्यानंतर तासाभरात सायंकाळी 7 वाजता हा विसर्ग 53288 क्युसेक इतका करण्यात आला.

काल सकाळी 6 वाजेपर्यंत मागील 24 तासांत पडलेला पाऊस असा- दारणा 110 मिमी, मुकणे 156, वाकी 244, भाम 179, भावली 217, वालदेवी 61, गंगापूर 99, कश्यपी 94, गौतमी गोदावरी 98, कडवा 32, आळंदी 75, नाशिक 51, घोटी 183, इगतपूरी 185, त्र्यंबक 137, अंबोली 157 मिमी असा पाऊस धरणांच्या पाणलोटात पडला. या 24 तासांतील पावसाने दारणात दीड टीएमसी पाण्याची नव्याने आवक झाली. गंगापूर मध्ये पाऊण टीएमसीहुन अधिक पाणी दाखल झाले. नाशिक जिल्ह्यात धरणांमध्ये सरासरी 94.44 टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी कालच्या तारखेला तो 82.30 टक्के इतका होता. नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून काल अखेर पर्यंत 1 जून पासुन 44.3 टीएमसी पाण्याचा विसर्ग गोदावरीतून जायकवाडीच्या दिशेने करण्यात आला.

जायकवाडीतुन विसर्ग

खाली जायकवाडीत धरणात 99.81 टीएमसी पाणीसाठा आहे. या धरणाची क्षमता 102.73 टीएमसी इतकी आहे. हे धरण 96.20 टक्के इतके भरले आहे. धरणात उपयुक्त पाणीसाठा 73.75 टीएमसी इतका आहे. काल या धरणाची 27 पैकी 18 दरवाजे दिड फुट उचलण्यात आली आहेत. त्यामुळे गोदावरीत या धरणातुन 28296 क्युसेकने सोडण्यात येत आहे.

Breaking News: After Bhandardara, Nilwande also filled Mula Dam too

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here