Home अकोले अकोले तालुक्याला मेंदूच्या डॉक्टरची गरज, तपासणीसाठी माझ्याकडे पाठवा- सुजय विखे यांचे सूचक...

अकोले तालुक्याला मेंदूच्या डॉक्टरची गरज, तपासणीसाठी माझ्याकडे पाठवा- सुजय विखे यांचे सूचक विधान

Breaking News | Akole: कोणाची मेंदूची तपासणी करायची असल्यास माझ्याकडे पाठवा. अकोले तालुक्याला मेंदूच्या डॉक्टरची आवश्यकता आहे, हे नाकारून चालणार नाही, असेही विखे म्हणाले.

Akole taluka needs a brain doctor, send him to me for examination - Sujay Vikhe

अकोले:  जागतिक आदिवासी दिनाच्या परवाच्या घटनेत अकोल्यात काय घडलेय ते आपण सर्वांनीच पाहिले. त्यामुळे अकोले तालुक्यासाठी एका मेंदुच्या डॉक्टराची गरज आहे. मी मेंदुचा डॉक्टर आहे. ज्यांना मेंदुची तपासणी कराक्याची असेल त्यांना माझ्याकडे पाठवा. कारण तशी गरज आहे. वैभवराव काळजी करू नका, आपण सगळे कर्ज फेडू. राजकारणात अनेक लोकांना आपण सल्ले दिले, काही लोकांना त्याचा फायदा झाला, पण काही लोकांनी ते घेतले नाहीत, त्याचे नुकसान ते भोगू राहिलेत, असे सूचक विधान माजी खासदार सुजय विखे यांनी केले.

या विधानाचा अर्थ अकोल्यातील महायुती सरकारच्या घटक पक्षांतील राष्ट्रवादीचे आमदार व पदाधिकाऱ्यांवर सुजय विखे यांच्या माध्यमातून यापुढील काळात पालकमंत्री राधाकृष्ण विखेंचे नियंत्रण आणण्यात येईल. तसेच महायुतीत शिर्डीतून लोकसभेत सुजय विखे व अकोल्यात विधानसभेत वैभव पिचड यांना संधी राहील, असा अर्थ राजकीय वर्तुळातून काढण्यात येत आहे.

अकोल्यातील सुगाव बुद्रुक फाट्यावरील एका खाजगी रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी सोमवारी (११ ऑगस्ट) डॉ. विखे हे आले होते. व्यासपीठावर आमदार अमोल खताळ, माजी आमदार वैभव पिचड, बजरंग दल संघटनेचे राष्ट्रीय नेते शंकरराव गायकर, दशरथ सावंत, योगी केशव बाबा चौधरी वीरगावकर आदी उपस्थित होते.

डॉ. विखे म्हणाले, या भागांतील भौगोलिक परिस्थितीमुळे इथं कुठली मोठी वास्तू निर्माण होऊ शकली नाही. धरणं व कालव्यांच्या भूसंपादनात गेलेल्या जागा असतील, पण तालुक्याची संपर्क भौगोलीक रचना पाहीली तर अकोले तालुक्याचे अहिल्यानगर जिल्ह्यावर अंनत उपकार आहेत. अकोले तालुका हा संपूर्ण उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला पाणी पाजणारा तालुका आहे. मात्र इथले लोकं उपाशी राहिले, ही या तालुक्याची रचना आहे.

अकोले तालुक्याचे व स्व. मधुकरराव पिचड यांचे जिल्ह्याच्या विकासासाठी मोठे योगदान आहे. खरंतर मला वैद्यकीय क्षेत्रात फार चांगले दिवस होते, पण अता इकडे आलोय तर इथे त्या शिक्षणाचा मला काही उपयोग नाही. पण ज्याने जे शिक्षण घेतलं असेल, त्याने त्याच शिक्षणाशी निगडितच व्यवसाय करावे. डॉक्टर व्यावसायात अहंकार व मीपणाला जागा नाही, म्हणून पेशंट जगला पाहिजे याकडेच लक्ष देऊन काम केले पाहिजे. अकोल्यातील आदिवासी भागांतून दरवर्षी तीन हजार पेशंटवर पीएमटीत उपचार होतात. पेशंटच कल्याण झालं नाही तरी चालेल पण पेशंटचा आपल्या हातून वाईट होता कामा नये, असे मला न्यूरोसर्जन म्हणून सांगितले होते, पण दुर्दैवानं तो मंत्र आता मला लागू राहिलेला नाही. आता चांगलं कमी व वाईटच मी जास्त करतोय, त्याला आता पर्याय नाही.

जेव्हा एखाद्या हॉटेलचे उद्घाटन असेल तर पहिल्या दिवशी उपस्थितांना जेवण मोफत असतं. त्यामुळे आज जेवढे लोक हॉस्पिटलच्या उद्घाटनास आलेत, त्यांच्या ईसीजी, एक्स-रे, रक्त, लघवी व इतर सर्व वैद्यकीय तपासण्या आजच्या दिवस फुकट होतील. आणि मी मेंदूचा डॉक्टर आहे, कोणाची मेंदूची तपासणी करायची असल्यास माझ्याकडे पाठवा. अकोले तालुक्याला मेंदूच्या डॉक्टरची आवश्यकता आहे, हे नाकारून चालणार नाही, असेही विखे म्हणाले.

डॉक्टरांनी, कर्जफेड होईल, एवढेच पैसे पेशंटकडून घ्या

मी डॉक्टर म्हणून आतापर्यंत इतके प्राण वाचवले की, आज माझा पराभव होऊन देखील मी तेवढ्याच आनंदाने तुमच्यासमोर भाषण करायला उभा आहे. याचं कारण ते बरे झालेले पेशंट मला आशीर्वाद देऊन गेले. परमेश्वराच्या आशीर्वादापेक्षा गरिबांचा आशीर्वाद मोठा असतो, या धोरणाने मी माझं जीवन जगतो. आज या हॉस्पीटलला शुभेच्छां देणं म्हणजे तुमचे हॉस्पिटल चांगले चालावे. आणि तुमचं हॉस्पिटल चांगलं चालण्यासाठी अर्धे अकोले आपल्याला आजारी पाडावे लागेल, म्हणून शुभेच्छा कशा द्यायच्या हे मला माहीत नाही, पण तुमचे हॉस्पिटलचे कर्जफेड होईल, एवढेच पैसे पेशंटकडून घ्यावे, असे डॉ. विखे म्हणाले.

Breaking News: Akole taluka needs a brain doctor, send him to me for examination – Sujay Vikhe

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here