Ashadhi Ekadashi : इथे वारी म्हणजे केवळ धार्मिक यात्रा नाही तर भक्ती, समर्पण, आत्मबोध, करुणा, दया, समता या संस्कारांचा एक संगम आहे.
Ashadhi Ekadashi Special: पढरीच्या वारीची परंपरा ही महान आहे. वारकऱ्यांना पंढरपूर हे माहेर वाटते. अर्थातच पांडुरंगात आई पाहिली जाते. आई भेटल्याचा मनस्वी आनंद होतो. ‘माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तिरी’ असे वर्णनच पांडुरंगाच्या भेटीचे केलेले आहे. दरवर्षी लाखो भाविक पंढरपूरला पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीने पायी जातात. सासरवाशीण आणि आई यांच्यात एक प्रेमस्वरुप नाते असते, एक मायेची ओढ असते. तीच ओढ पंढरीच्या माहेराची असते. प्रत्यक्ष परब्रह्माची सेवा कायिक, मानसिक, वाचिक या प्रकारे केली जाते. उन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता वारकऱ्यांचा प्रवास सुरू असतो. मुखाने ज्ञानोबा-तुकाराम, रामकृष्णहरी असा गजर करत वारकरी चालत असतात ते विठ्ठलाला डोळे भरून पाहण्यासाठी. ‘रुप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी’ असेच या भेटीचे वर्णन आहे. काम, क्रोध, मद, मोह, मत्सर या विकारावर मात करून जो वारी करतो, तोच खरा वारकरी होय. स्वातंत्र्य, बंधुता, समता, नम्रता या नीतीमूल्यांची शिकवण, संस्कार हे वारकऱ्यांमध्ये अंतर्भूत असतात. ‘संतकृपा झाली, इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया’ असे या वारकरी संप्रदायाबाबत म्हटले जाते.
प्रपंचरुपी भवसागर पार करण्यासाठी पंढरीच्या पांडुरंगाची वारी केली जाते. शेतीची कामे, प्रापंचिक समस्या, पांडुरंगाच्या विश्वासावर सोडून वारकरी १५ दिवस पांडुरंगाच्या भेटीला जात असतो. ‘पुंडलिक भक्तराज, तेणे साचियले काज, वैकुंठीजे निज, परब्रह्म आणिले’ असाच अनुभव भक्तांना येतो.
‘पुंडलिका भेटी परब्रह्म आले गा’ या संत नामदेव महाराजांच्या रचनेतून वारीचे सार सांगितले जाते. इथे वारी म्हणजे केवळ धार्मिक यात्रा नाही तर भक्ती, समर्पण, आत्मबोध, करुणा, दया, समता या संस्कारांचा एक संगम आहे.
या वारीचा अन्वयार्थ म्हणजे आई-वडिलांची सेवा होय. ‘भेदाभेद भ्रम अमंगळ’ हेच वारीला साध्य करायचे आहे. पुंडलिकाने केलेली आपल्या माता-पित्यांची सेवा पाहून प्रत्यक्ष पांडुरंगाने त्याच्या घरी धाव घेतली. पुंडलिकाने पांडुरंगाला वीट देऊन उभे केले, मात्र माता-पित्यांच्या सेवेत खंड पडू दिला नाही. सेवा करणारा विठ्ठल हाच भागवत धर्मीयांचे उपास्य दैवत बनले. माता-पित्यांची सेवा हेच पांडुरंगाला पंढरीत येण्याचे प्रयोजन ठरते. वारकरी संप्रदायामध्ये हे प्रयोजन वारीसाठी श्रेष्ठ मानले गेले आहे. सर्व तीर्थांचे उगमस्थान हे आई-वडिलांची सेवा आहे. त्यांना प्रेमाने सांभाळले तरच पांडुरंगाची कृपा होईल. आई- वडिलांची सेवा न करता वारीला गेलेल्या वारकऱ्यास पांडुरंग प्रसन्न होईल का?, म्हणूनच वारीचा मूळ हेतू, मूळ तत्त्व हे आई-वडिलांची सेवा हेच आहे. प्रा. महेश कुलकर्णी, पेमराज सारडा महाविद्यालय, अहिल्यानगर
Breaking News: Ashadhi Ekadashi Special