पराभव झाल्याने संगमनेर अशांत करण्याचा प्रयत्न- आ. अमोल खताळ
Breaking News | Sangamner Crime: मारहाण करणारे कार्यकर्ते काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे असल्याचा आरोप करण्यात आला असून तुषार भोसले यांनी देखील थोरात यांच्यावर टीका केली.

संगमनेर: शनिवारी रात्री संगमनेर शहरालगत असणाऱ्या घुलेवाडी गावात सुरू असलेल्या कीर्तनावेळी काही जणांनी आक्षेप घेत गोंधळ घातला. यानंतर हभप संग्राम बापू महाराज भंडारे यांना मारहाण झाल्याचा गुन्हा संगमनेर शहर पोलिसात दाखल झाला. याप्रकरणी निषेध करण्यासाठी आज झालेल्या आंदोलनात शिवसेना (शिंदे गट) आमदार अमोल खताळ यांच्यासह भाजप अध्यात्मिक सेलचे अध्यक्ष तुषार भोसले देखील सहभागी झाले. यावेळी मारहाण करणारे कार्यकर्ते काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे असल्याचा आरोप करण्यात आला असून तुषार भोसले यांनी देखील थोरात यांच्यावर टीका केलीय. तर बाळासाहेब थोरात यांनी खोटे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केलाय. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आजी-माजी आमदार समोरासमोर येणार असल्याने भविष्यात हा वाद वाढण्याची शक्यता आहे.
संगमनेर शहराजवळ असणाऱ्या घुलेवाडी गावातील हनुमान मंदिरात हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी राजगुरुनगर येथील हभप संग्राम बापू महाराज भंडारे यांचे कीर्तन होते. मात्र कीर्तन सुरू असताना महाराजांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केल्याने काही जणांनी विरोध केला. यावरून बराच वेळ गोंधळ झाल्याने महाराज देखील कीर्तन अर्धवट सोडून निघून गेले. यानंतर या प्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल झाला. याच मारहाणीचा निषेध करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी नाशिक-पुणे महामार्गावर दीड तास रास्ता रोखून धरत घटनेचा निषेध केलाय. यावेळी शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांच्यासह भाजप अध्यात्मिक सेलचे अध्यक्ष तुषार भोसले देखील सहभागी झाले होते. यावेळी खताळ आणि भोसले यांनी थेट बाळासाहेब थोरात यांना टीकेचे लक्ष्य केले असून त्यांच्याच कार्यकर्त्यांनी गोंधळ घालून मारहाण केल्याचा आरोप केलाय.
काय म्हणाले अमोल खताळ?
अमोल खताळ म्हणाले की, चाळीस वर्षांपासून बिघडलेल्या संस्कृतीची आठ महिन्यात घडी बसायला सुरुवात झालीय. कीर्तन सुरू होण्याआधी यांनीच कर्मचाऱ्यांना तिथे जायला लावले. पराभव झाल्याने संगमनेर अशांत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यातून स्वतःचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी धडपड सुरू आहे. अफजल खान व औरंगजेब यांच्यावर बोलताना तुमचे बगलबच्चे महाराजांवर धावून जात असतील तर हे कायद्याचं राज्य आहे. तुमच्या काळात पोलिसांवर हल्ले झाले होते. मात्र, आमच्या काळात समाजकंटकांवर कारवाई होणारच आहे. तुम्ही असा प्रयत्न करून पाहा. तुमच्यावर देखील कायदेशीर कारवाईसाठी आग्रह करू, असा हल्लाबोल त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर केलाय.
काय म्हणाले तुषार भोसले?
तुषार भोसले म्हणाले की, राज्यातील साधू महंत आणि कीर्तनकारांनी हिंदुत्वावर जागरूकता आणल्याने महायुतीला यश मिळाले हा रिपोर्ट राहुल गांधींपर्यंत गेलाय. त्यामुळे राहुल गांधींनी हा प्रचार, प्रसार बंद झाला पाहिजे असा आदेश पक्षाच्या नेत्यांना दिलाय. त्यामुळेच थोरातांनी आपल्या बगलबच्यांच्या मदतीने हा प्रयत्न केला. मात्र संगमनेरच्या हिंदुत्ववाद्यांनी हा प्रकार हाणून पाडला. राज्यात हा प्रयत्न पुन्हा केल्यास गाठ तुषार भोसलेंशी आहे. राहुल गांधी जे संविधान घेऊन फिरतात, त्या संविधानाने सर्वांना बोलण्याचा अधिकार दिला आहे. कोणाच्या बापात हिंमत नाही की कीर्तन बंद पाडू शकतात, अशी टीका त्यांनी बाळासाहेब थोरातांवर केली आहे.
Breaking News: Attempt to create unrest in Sangamner due to defeat- MLA Amol Khatal


















































