संगमनेरात बाळासाहेब थोरात कडाडले म्हणाले, अशांतता निर्माण करणार्या गावगुंडांचा….
Breaking News | Balasaheb Thorat: तालुक्याच्या विकास आणि शांततेचे राजकारण मोडण्यासाठी येथील लोकप्रतिनिधी हा हत्यार म्हणून काम करत असून अशांतता निर्माण करणार्या गावगुंडांचा बंदोबस्त करा, असे आवाहन काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
संगमनेर: कीर्तनकार संग्रामबापू भंडारे यांचा निषेध करण्यासाठी गुरुवारी (दि.21) शांती मोर्चा झाला. यावेळी संगमनेर तालुक्याच्या विकास आणि शांततेचे राजकारण मोडण्यासाठी येथील लोकप्रतिनिधी हा हत्यार म्हणून काम करत असून अशांतता निर्माण करणार्या गावगुंडांचा बंदोबस्त करा, असे आवाहन काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
विविध संघटना आणि महाविकास आघाडीच्यावतीने माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना कीर्तनकार भंडारे यांनी धमकी दिल्याच्या निषेधार्थ शांती मोर्चा संपन्न झाला. यावेळी मोर्चाला संबोधित करताना माजी मंत्री थोरात म्हणाले, थोर स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात यांचा मी मुलगा आहे. संघर्ष आपल्याला नवीन नाही.
विचारांसाठी आणि तत्त्वासाठी बलिदान देण्याची आपली तयारी आहे. हिंदू धर्म आणि वारकरी संप्रदायाचे आम्ही पाईक आहोत. गगनगिरी महाराजांच्या सप्ताहमध्ये वाढण्यापासूनचे काम आपण केले आहे. गावोगावी मंदिरांचे बांधकाम व सुशोभीकरण आपण केले. राष्ट्रपुरुष आणि संतांनी सांगितलेला मानवतेचा विचार घेऊन आपण पुढे चाललो. कधीही धर्माचा देखावा केला नाही. चुकीचा वागला त्याला शिक्षा झाली पाहिजे हा आग्रह आम्ही धरला. मात्र, नवीन लोकप्रतिनिधीने निवडणुकीच्या अगोदर कधी भगवी टोपी घातली होती का? असा सवाल करत भगवी टोपी घातली म्हणजेच हिंदू हे चुकीचे आहे. चाळीस वर्षांमध्ये हा तालुका आपण उभा केला. सुसंस्कृत राजकारणाची परंपरा निर्माण केली. सातत्याने विकासकामे करून तालुका राज्यात अग्रक्रमणाने पुढे नेला.
हा विकास काहींना पाहवत नाही आणि म्हणून या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून हत्यार म्हणून आपला तालुका मोडण्याचे षडयंत्र आखले जात आहे. मागील आठ महिन्यामध्ये तालुक्यामध्ये गुंडगिरी आणि दहशत वाढली आहे. नवीन लोकप्रतिनिधीने डीएनए शब्द वापरला त्याचा अर्थ तरी त्याला माहीत आहे का? इतक्या खालच्या पातळीवरचे राजकारण तालुक्यात कधीही झाले नाही. तो तथाकथित महाराज नारदाच्या गादीचा अपमान करतो आहे. पाकीट घेऊन कीर्तन करतो आहे. त्याला राजकारण करायचे तर त्याने राजकीय स्टेजवर भाषण करावे. तालुक्यात दहशत निर्माण करण्याचा डाव आखला जात असून गावोगावी गुंड दहशत माजवत आहे. आपल्याला आपल्या तालुक्याची संस्कृती जपायची असून तालुक्याच्या विकासाची वाटचाल सुरू ठेवण्यासाठी गुंडांना वेळीच रोखा, असे आवाहन त्यांनी केले.
आमदार सत्यजीत तांबे म्हणाले, संगमनेर तालुक्याचा जो विकास झाला आहे. त्यामध्ये बाळासाहेब थोरात यांचेच योगदान आहे. हिंदुत्व धर्म हा सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा आहे जातीभेद करण्याचा नाही. नवीन आमदाराने आमचे हिंदुत्व पाहू नये. हा तथाकथित कीर्तनकार नथुराम गोडसेचे उदात्तीकरण करत असेल तर आम्ही कदापि मान्य करणार नाही. आम्ही वारकरी संप्रदायाचे हिंदुत्ववादी आहोत. मीही आमदार आहे. कार्यकर्त्यांनी अजिबात घाबरू नये. आमच्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न सुद्धा करू नये, असा इशारा त्यांनी दिला. तर तालुक्यामध्ये तरुणांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. दहशत निर्माण केली जात आहे हे आम्ही चालू देणार नाही. नथुराम गोडसे हा आपला आदर्श नाही. दिखाऊ हिंदुत्व आपले नाही. कारण आपण खरे हिंदू आहोत. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि तो विचार घेऊन आपण पुढे जात आहोत, असे डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या.
Breaking News: Balasaheb Thorat Kadadle said at Sangamnerat