Home संगमनेर संगमनेर: भंडारे महाराज धमकी प्रकरणी बाळासाहेब थोरातांनी दिले प्रत्युत्तर म्हणाले….

संगमनेर: भंडारे महाराज धमकी प्रकरणी बाळासाहेब थोरातांनी दिले प्रत्युत्तर म्हणाले….

Breaking News | Sangamner | Balasaheb Thorat: कीर्तनकार संग्रामबापू महाराज भंडारे यांनी ‘बाळासाहेब थोरात आम्हाला नथुराम गोडसे व्हायला लावू नका’ असे वक्तव्य केले होते.

Balasaheb Thorat responded to the Bhandare Maharaj threat case

संगमनेर: वारकरी संप्रदाय मानव धर्म मानणारा आहे. आम्ही प्रत्येक अखंड हरिनाम सप्ताहात सहभागी होतो. पण या संप्रदायाचा वापर राजकीय हेतूसाठी करणे हा वारकरी परंपरेचा अवमान आहे. जो कोणी नथुराम गोडसेचे नाव घेऊन वारकरी संप्रदायाला कलंक लावेल, त्याचा मी ठाम विरोध करेन. गरज पडली तर अशा लढाईसाठी माझे बलिदान द्यायलाही मी मागेपुढे पाहणार नाही, असे ठाम विधान माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

कीर्तनकार संग्रामबापू महाराज भंडारे यांनी ‘बाळासाहेब थोरात आम्हाला नथुराम गोडसे व्हायला लावू नका’ असे वक्तव्य केले होते. त्यानंतर मंगळवारी (दि.19) संगमनेरातील यशोधन कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना माजी मंत्री थोरात म्हणाले, वारकरी संप्रदाय हा मानवतेचा व भक्तिभावाचा संदेश देणारा आहे. मात्र काही तथाकथित महाराज अभंग व कीर्तनाऐवजी राजकारण करत आहे, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. राज्यघटनेला ठेच पोहोचेल असे वक्तव्य कोणीही करू नये. कीर्तनकारांनी भक्तिमार्ग सोडून राजकारणावर भाष्य करणे योग्य नाही. खरे कीर्तनकार या वादात पडत नाहीत. पण काहीजण व्यासपीठावरून नथुराम गोडसेसारखी उदाहरणे देतात, ते वारकरी संप्रदायाचे असू शकत नाहीत, असा घणाघात थोरात यांनी केला.

हरिनाम सप्ताहामध्ये आपण सर्वांनी एकत्र येऊन तो साजरा केला पाहिजे. मतभेद दूर केले पाहिजेत, बंधुभावाचे वातावरण निर्माण केले पाहिजे. एकमेकांविरुद्ध लढलेल्या दोन उमेदवारांनीही एकत्र येऊन महाप्रसाद वाटला पाहिजे, या विचाराचा मी आहे. जे आज तालुक्यात उभं केलं, चांगल्या पद्धतीने घडवलं, ती संस्कृती संगमनेरची निर्माण केलेली आहे ती आम्हाला मोडावी वाटणार नाही, आम्ही जपण्याचाच प्रयत्न केला असल्याचे ठामपणे सांगितले.

दरम्यान, कीर्तन सुरू असताना उपस्थित एका युवकाने महाराज अभंगावर बोला अशी विनंती केली असता संबंधित महाराज त्या युवकाला सायको म्हणाले. त्यातच येथील लोकप्रतिनिधी कोणाच्या तरी हातातील खेळणे झाले आहे. खोट्या केसेस दाखल करून लोकांना गप्प केले जात आहे. पोलिसांवरही प्रचंड दबाव आहे. यामागे हेतूपुरस्सर अशांततेचे वातावरण निर्माण करण्याचा डाव आहे. संगमनेर तालुक्यात बंधुभावाचे राजकारण होते; मात्र आता दहशतीचे वातावरण निर्माण केले जात आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी देखील वातावरण बिघडविण्याचे काम करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहे म्हणून अशा पद्धतीने तालुक्यात वातावरण खराब करण्याचे काम सुरू आहे. मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी या घटनांची गांभीर्याने दखल घ्यावी. महाराष्ट्रातील राजकारणाची पातळी खालावली आहे. अनेक मंत्री घोटाळ्यात सापडले असून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी वेगळे मुद्दे पुढे आणले जात असल्याचा गंभीर आरोपही केला.

Breaking News: Balasaheb Thorat responded to the Bhandare Maharaj threat case

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here