संगमनेर: भोजापूर चारीवरुन आजी-माजी मंत्र्यांमध्ये श्रेयवादाची लढाई
Breaking News | Sangamner: भोजापूर चारीचा समावेश दमणगंगा वैतरणा गोदावरी नदीजोड प्रकल्पात झाल्याने या भागाचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही जलसंपदा तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
संगमनेर: भोजापूर चारीला पाणी देण्याचा शब्द आठ महिन्यांत पूर्ण केला. चारीच्या विस्तारीकरणासाठी 30 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला लवकरच मंजुरी देणार असून, भोजापूर चारीचा समावेश दमणगंगा वैतरणा गोदावरी नदीजोड प्रकल्पात झाल्याने या भागाचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही जलसंपदा तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. संगमनेर तालुक्यातील तिगाव माथा येथे भोजापूर चारीला तब्बल चाळीस वर्षानंतर आलेल्या पाण्याचे पूजन मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
याप्रसंगी आमदार अमोल खताळ, भोजापूर चारी संघर्ष समितीचे अध्यक्ष किसन चत्तर, भाजपचे अध्यक्ष श्रीकांत गोमासे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष रामभाऊ रहाणे, भीमराज चतर, विठ्ठल घोरपडे, संदीप देशमुख, प्रभारी सरपंच मयूर दिघे, गणेश दिघे, अमोल दिघे, प्रकाश सानप, शरद गोर्डे, रामदास दिघे, दत्तात्रेय दिघे, श्रीकांत थोरात, उत्तम दिघे, डॉ. संतोष डांगे, नीलेश दिघे, प्रांताधिकारी अरूण उंडे, प्रादेशिक जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांसह लाभक्षेत्रातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तिगाव येथे मंत्री विखे पाटील यांचे भव्य स्वागत करून बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. लाभक्षेत्रातील शेतकर्यांच्यावतीने मंत्री विखे पाटील आणि आमदार खताळ यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पुढे बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी याठिकाणी येवून चारीच्या कामाचे भूमिपूजन केले होते. दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याने पूर चारीचे रखडलेले काम पूर्ण झाले. प्रत्यक्षपणे पाणी आल्याने दिलेल्या शब्दाची पूर्तता झाल्याचे समाधान आहे. राज्यातील महायुतीचे सरकार जनतेच्या मनातील सरकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प केला असून नदीजोड प्रकल्पाच्या माध्यामातून दुष्काळी भागातील गावांना पाणी देण्याचे शासनाचे धोरण असल्याचे सांगून मंत्री विखे पाटील म्हणाले, जलसंधारण विभागाकडे असलेली भोजापूर चारी जलसंपदा विभागाकडे वर्ग झाल्याने चारीच्या कामाला गती येईल. पाणी आल्याने चारीच्या विस्तारीकरणाची केलेल्या मागणीबाबत विभागाने यापूर्वीच निर्णय करून 30 कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव सादर केला असून त्याला लवकर मंजुरी देण्यात येणार आहे.
राज्यात दुष्काळी भागातील गावांना पाणी मिळवून देण्यासाठी महायुती सरकारने नदीजोड प्रकल्पाला गती देण्याचा निर्णय केला आहे. भोजापूर चारीचा समावेश दमणगंगा वैतरणा गोदावरी या प्रकल्पात करण्यात आला असून यामुळे 33 हजार हेक्टर क्षेत्राला याचा लाभ मिळू शकेल, याचा प्रकल्प अहवाल पूर्णत्वाच्या मार्गावर असल्याचे नामदार विखे पाटील यांनी सांगितले. भोजापूर चारीच्या संदर्भात काही गावांमध्ये विनाकारण गैरसमज पसरवून देण्यात आले. यातून तालुक्यातील लोकांना काहीही मिळणार नाही. काही गावांचा समावेश करू नये म्हणून कोणी पत्र दिले, याची सर्व माहिती माझ्याकडे आहे असे सूचक विधान करून ज्यांनी फक्त आश्वासने दिली, टँकरने पाणी आणून टाकले, त्यांना जनतेने उत्तर देवून टाकले आहे.
आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून तालुक्यात नवा आशय प्राप्त होत असून त्यांच्या पाठपुराव्यामुळे भोजापूर चारीचा प्रश्न सुटला असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी आवर्जून सांगितले. तळेगाव प्रमाणेच साकूर आणि पंचक्रोशीतील गावातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी योजना तयार केल्या असून त्याचीही सुरूवात लवकरच होईल असे मंत्री विखे पाटील म्हणाले. तर तालुक्यातील जनतेला केवळ आश्वासनं देणारी माणसं आज उघडी पडली आहेत. स्वतःला जलनायक म्हणून घेणारे आज खलनायक ठरले आहेत. पाण्याच्या प्रश्नावरून विखे पाटील यांना बदनाम करणार्यांनी लक्षात घ्यावे की निळवंडे आणि भोजापूरचे पाणी विखे पाटील यांनीच आणून दाखवले. भविष्यात तालुक्यातील रस्ते, रोजगार आणि पाण्याचे प्रश्न महायुती सरकारच्या माध्यमातून सोडविणार असल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले. प्रास्ताविक गणेश दिघे यांनी केले. सूत्रसंचालन अॅड. गोरक्ष कापकर यांनी केले तर अमोल दिघे यांनी आभार मानले.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा परखड सवाल
संगमनेर: दुष्काळी भागाला पाणी मिळावे यासाठी प्रामाणिक प्रयत्न करून आपण निळवंडे धरण व कालवे पूर्ण केले. कालव्यांच्या वरच्या बाजूला पाणी मिळावे हा आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. स्वातंत्र्यसैनिक, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून कारखान्याच्या मदतीने भोजापूर चारी तयार केली. पाणी देण्यासाठी आपण सातत्यपूर्ण काम केले. यावर्षी मे महिन्यातच चांगला पाऊस झाल्याने निसर्गाची कृपा झाली. तयार असलेली चारी आणि चांगला झालेला पाऊस यामुळे पाणी आले असल्याचा आनंद आहे. मात्र तुमचे या चारीमध्ये योगदान काय? असा सवाल माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारला आहे.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की निमोण, नान्नज दुमाला या दुष्काळी परिसराला पाणी मिळावे याकरीता 1977 मध्ये संगमनेर व प्रवरा कारखाना यांनी संयुक्त खर्चातून चारी करावी असे ठरले. मात्र प्रवरा कारखान्याने यामधून अंग काढून घेतले. 1994 मध्ये स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात यांच्या पुढाकारातून कारखान्याने त्यावेळेस खर्च करून ही पूरचारी निर्माण केली. 1996 मध्ये वटमाई डोंगराजवळ पाणी आले. हे पाणी पुढे तिगाव माथापर्यंत नेता येईल याचा विचार करून सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी कारखान्याच्या माध्यमातून ही संकल्पना राबविली. 2006 मध्ये कारखान्याची यंत्रणा व सर्व कामगार यांनी श्रमदान करून तिगाव माथापर्यंत चारी पूर्ण केली. 2 ऑक्टोबर, 2006 मध्ये येथे पाणी पूजन केले.
आपण जलसंधारण मंत्री असताना 2008 मध्ये या चारीच्या दुरुस्ती, सेतू, काँक्रिट कामे व लांबीकरीता 5 कोटी 85 लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. त्या माध्यमातून सातत्याने कामे केली. भोजापूरचे पाणी दरवर्षी निमोण, पिंपळे, नान्नज दुमाला, पारेगाव बुद्रुक, तळेगाव, तिगाव, वडझरी या गावांकरीता मिळावे म्हणून पाठपुरावा केला. याचबरोबर ही चारी जलसंधारण विभागाकडे हस्तांतरित केली. 2021 मध्ये पुन्हा चारीच्या दुरुस्तीकरीता 2 कोटी 12 लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. अनेकवेळा पिंपळे धरण भरल्यामुळे पारेगाव बुद्रुक, चिंचोली गुरव, देवकौठ्यापर्यंत पाणी गेले. सुरुवातीला चारीच्या कामासाठी वेळोवेळी आंदोलने केली. हे सर्व जनतेला माहीत आहे.
Breaking News: Battle of credit between current and former ministers over Bhojapur Chari