संगमनेरात कीर्तन सुरू असताना भंडारे महाराज यांच्यावर हल्ला
Breaking News | Sangamner Crime: राजगुरुनगर येथील संग्रामबापू महाराज भंडारे यांचे कीर्तन सुरू असताना अचानक चौघांनी महाराजांना शिवीगाळ करीत अंगावर धावून जात हल्ला केला आणि जाणीवपूर्वक गोंधळ घातल्याची घटना.

संगमनेर: तालुक्यातील घुलेवाडी येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात शनिवारी (दि.16) रात्री दहा वाजेच्या सुमारास राजगुरुनगर येथील संग्रामबापू महाराज भंडारे यांचे कीर्तन सुरू असताना अचानक चौघांनी महाराजांना शिवीगाळ करीत अंगावर धावून जात हल्ला केला आणि जाणीवपूर्वक गोंधळ घातल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी निष्पन्न चौघांसह इतर 8 ते 10 जणांवर शहर पोलिसांत विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. घुलेवाडी सप्ताहामध्ये चौथ्या दिवसाची कीर्तन सेवा संग्रामबापू महाराज भंडारे यांची होती.
शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास चालू कीर्तनात येथीलच नीलेश दगडू गायकवाड याने महाराजांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करुन हल्ला केला. तसेच सोबत असलेले अनिल बबन राऊत, वैभव दगडू गायकवाड व तुळशीराम रामचंद्र दिघे (सर्व रा. घुलेवाडी) हे देखील महाराजांच्या अंगावर धावून गेले. तेव्हा इतरही 8 ते 10 जण होते. कीर्तन सेवेच यजमान असलेले स्वरुप गजानन राऊत यांनाही या सर्वांनी, ‘तुम्ही हरिनाम सप्ताह कसा करतात ते पाहतो’ अशी धमकी देत कीर्तन बंद पाडले. त्यानंतर महाराजांच्या गाडीचीही तोडफोड करुन नुकसान केले.
याबाबत कीर्तनाचे यजमान असलेले स्वरुप गजानन राऊत (वय 35, रा. घुलेवाडी) यांनी शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन वरील नीलेश गायकवाड, अनिल राऊत, वैभव गायकवाड, तुळशीराम दिघे या चौघांसह इतर 8 ते 10 जणांवर भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल मोरे हे करत आहे.
Breaking News: Bhandare Maharaj attacked while kirtan was being performed at Sangamner

















































