केंद्रात, राज्यात कॉंग्रेस विचारांचे सरकार आणू: बाळासाहेब थोरात
Breaking News | Sangamner Politics: काँग्रेस पक्षाला त्याग व बलिदानाची परंपरा आहे. जी दुसऱ्या कोणत्याही पक्षाला नाही. त्यामुळे काँग्रेस पक्ष कधीही संपणार नाही.
संगमनेरः काँग्रेस पक्ष हा देशातील सर्वात जुना व अनुभवी पक्ष असून काँग्रेस विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. काँग्रेसकडे सक्षम व समर्थ नेतृत्व व कार्यकर्ते आहेत. काँग्रेस पक्षाला त्याग व बलिदानाची परंपरा आहे. जी दुसऱ्या कोणत्याही पक्षाला नाही. त्यामुळे काँग्रेस पक्ष कधीही संपणार नाही.
सध्या देश हा भयावह परिस्थितीतून जात असून सर्वसामान्य जनता होरपळत आहे. यासाठी पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाला उभारी घ्यावी लागणार असून आगामी काळात केंद्रात व राज्यात काँग्रेस व राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू, असे प्रतिपादन काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय कार्यशाळेचे खडकवासला येथे उद्घाटन झाले. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, कुणाल चौधरी, यू बी. व्यंकटेश, उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ऍड. गणेश पाटील, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित होते.
यावेळी थोरात म्हणाले की, महात्मा गांधी, पंडित नेहरु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे आपण वारस आहोत. काँग्रेसला बलिदानाचा इतिहास आहे, याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. काँग्रेस पक्षाने कठीण काळ पाहिलेला आहे व पराभवही पाहिलेला आहे पण यातूनही काँग्रेस पक्षाने उभारी घेतली व पुन्हा विजय संपादन केल्याची त्यांनी आठवण करून दिली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी, माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम यांनीही मार्गदर्शन केले. युवक काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे व एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंके यांचा सत्कार करण्यात आला.
Breaking News: bring a government with Congress ideology at the Centre and in the state Balasaheb Thorat