Home अहिल्यानगर अहिल्यानगरमध्ये तीन बोगस डॉक्टरांविरूद्ध गुन्हा

अहिल्यानगरमध्ये तीन बोगस डॉक्टरांविरूद्ध गुन्हा

Breaking News | Ahilyanagar:  शहरातील दोन दवाखान्यांवर छापे टाकत तिघा मुन्नाभाईची पोलखोल, पदवी नसताना उपचार.

Case registered against three bogus doctors in Ahilyanagar

अहिल्यानगर : महापालिकेच्या आरोग्य  विभागाने शहरातील दोन दवाखान्यांवर छापे टाकत तिघा मुन्नाभाईची पोलखोल केली. कोणतीही पदवी नसताना मुळव्याध व भगंदरवर उपचार करणाऱ्या तीन बोगस डॉक्टरांविरोधात सोमवारी (दि. १४) कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. महापालिकेच्या या कारवाईने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

येथील डॉ. ठाकूर क्लिनिकचे ओम संतोष ठाकूर (रा. पिंजारगल्ली, अहिल्यानगर), चाँदसी दवाखाना डॉ. एम. डी. हालदार या दवाखान्याचे डॉ. मृत्युंजय धनंजय हालदार व त्याचा मुलगा संजय मृत्युंजय हालदार (दोघे रा. पिंजार गल्ली, अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरांची नावे आहेत. महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप बागल यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

मुंबई येथील माहिती आरोग्य सेवा रुग्णालय (राज्यस्तर) यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने १ एप्रिल रोजी डॉ. ठाकूर क्लिनिक व चाँदसी दवाखाना डॉ. एम. डी. हवालदार दवाखान्यावर छापा टाकला. त्यावेळी तिथे तिघे डॉक्टर रुग्णांवर उपचार करताना दिसले. त्यांच्याकडून पदवीबाबत विचारणा केली असता, त्यांच्याकडे पदवी प्रमाणपत्र मिळून आले नाही. वैद्यकीय पदवी नसताना ते रुग्णांची तपासणी करून उपचार करत होते.

दवाखान्यातील रुग्णांकडे चौकशी केली असता त्यांनी मूळव्याध, भगंदर, फिशर आदी आजारांवर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केल्याचे सांगितले. त्यानंतर पथकाने डॉक्टरांकडे वैद्यकीय पदवीची मागणी केली. परंतु, संबंधित डॉक्टरांनी पदवीचे प्रमाणपत्र न दाखविता नॅचरोपॅथी, इलेक्ट्रॉपॅथी, अशा डिप्लोमा कोर्सेसची प्रमाणपत्रे दाखवली.

वैद्यकीय पदवीबाबत, अॅलोपॅथी उपचार, शस्त्रक्रियाबाबत कोणतीही पदवी त्यांच्याकडे नसल्याचे उघड झाले.

यावरून तिघे डॉक्टर बोगस असल्याची पथकाची खात्री झाली. त्यानुसार ही फिर्याद दाखल करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. सतीष राजूरकर, डॉ. दिलीप बागल यांच्या पथकाने ही कारवाई केली. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक तेजश्री थोरात करत आहेत. डॉ. ठाकूर क्लिनिकचा डॉ. ओम ठाकूर याच्याविरोधात यापूर्वी पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. त्याच्याविरोधात हा दुसरा गुन्हा दाखल झाला असून, त्याच्याकडे पदवीचे कोणतेही प्रमाणपत्र नाही.

Breaking News: Case registered against three bogus doctors in Ahilyanagar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here