अहिल्यानगर: घराजवळ खेळणार्या 4 वर्षाच्या मुलाचा विहिरीत पडून मृत्यू
Breaking News | Ahilyanagar: घराजवळील शेतात खेळत असताना अवघ्या चार वर्षांच्या अनय श्रीकांत वर्पे या गोंडस मुलाचा विहिरीत दुर्दैवी अंत.

राहाता: शिर्डीजवळील सावळीविहीर खुर्द येथे सोमवारी सायंकाळी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. घराजवळील शेतात खेळत असताना अवघ्या चार वर्षांच्या अनय श्रीकांत वर्पे या गोंडस मुलाचा विहिरीत दुर्दैवी अंत झाला. या घटनेमुळे वर्पे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
सायंकाळी साडेचारच्या सुमारास अनय बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी आजूबाजूला शोध सुरू केला. मात्र विहिरीच्या काठावर अनयची चप्पल आणि दुसरी चप्पल पाण्यावर तरंगताना दिसताच कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. मुलगा विहिरीत पडल्याची भीषण शंका बळावल्याने तातडीने शिर्डी पोलीस व नगरपरिषदेच्या प्रशिक्षित रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले.
विहिरीतील प्रचंड पाणीसाठा आणि गाळामुळे अनयचा शोध घेणे हे मोठे आव्हान बनले होते. तात्काळ दोन ट्रॅक्टर मोटारींसह शक्तिशाली पंप लावून पाणी उपसा मोहीम सुरू करण्यात आली. पोलीस, रेस्क्यू टीम आणि स्थानिक नागरिकांनी तब्बल तीन तास अथक परिश्रम घेत अडथळ्यांची शर्यत पार पाडली. कठोर प्रयत्नांनंतर अखेर अनयचा मृतदेह (Dead Body) विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले, मात्र चिमुकल्या अनयचा निष्पाप जीव वाचू शकला नाही.
या घटनेनंतर अनयच्या आई-वडिलांनी केलेला आक्रोश हृदय हेलावून टाकणारा होता. सुरक्षा कठड्याच्या अभावामुळे एका निष्पाप चिमुकल्याचा बळी गेल्याचे भीषण वास्तव यानिमित्ताने समोर आले आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी लोकवस्तीजवळच्या उघड्या विहिरींच्या सुरक्षिततेबाबत ठोस उपाययोजना करण्याची गरज या घटनेने अधोरेखित केली आहे.
Breaking News: Child Death Falls Into a Well


















































