Home अहिल्यानगर शेतकरी मोठ्या संकटात, सरकारने फक्त पाहणी व छायाचित्रे काढून न जाता तातडीने...

शेतकरी मोठ्या संकटात, सरकारने फक्त पाहणी व छायाचित्रे काढून न जाता तातडीने मदत करावी – बाळासाहेब थोरात

Breaking News | Sangamner Rain Update: राज्य सरकारने पुरग्रस्त शेतकर्‍यांना दिलासा देत हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत जाहीर करून ती थेट शेतकर्‍यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी जमा करावी, अशी आग्रही मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.

Farmers are in great distress flood action Balasaheb Thorat

अहिल्यानगर:  राज्यातील तब्बल 30 जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने पुरग्रस्त शेतकर्‍यांना दिलासा देत हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत जाहीर करून ती थेट शेतकर्‍यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी जमा करावी, अशी आग्रही मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

शनिवारी (दि. 27) थोरात यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुका, तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव व पाथर्डी तालुक्यांमधील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर नगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी संवाद साधला. यावेळी आमदार हेमंत ओगले व जिल्हा बँक संचालक करण ससाणे यावेळी उपस्थित होते. यावेळी थोरात म्हणाले, राज्यात पुरस्थिती गंभीर असून मराठवाड्यासह नगर दक्षिण तालुक्यांतील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेत व गावांना जोडणारे रस्ते, पूल वाहून गेले. शेतजमिनी खरडून गेल्या.

घरांची पडझड, जनावरे मृत्युमुखी पडली, विहिरी बुजल्या, विजेचे खांब कोसळले, चार्‍याचा प्रश्न गंभीर झाला आहे. दुकाने, घरांमध्ये पाणी शिरल्याने विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने फक्त पाहणी व छायाचित्रे काढून न जाता तातडीने निर्णय घेऊन मदत वितरित करावी. त्यांनी पुढे सांगितले, केंद्र व राज्य सरकारने मिळून पंजाबमधील शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रुपये, मृत जनावरासाठी 40 हजार रुपये, तर घराची पडझड झाल्यास 50 हजार रुपयांची मदत दिली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही मदत द्यावी. सरकारने सरसकट पंचनामे करून दिवाळीपूर्वी मदत वितरित केली, तर शेतकर्‍यांची दिवाळी गोड होईल. जीएसटी परताव्याबाबत थोरात म्हणाले, महाराष्ट्राकडून केंद्र सरकारला सर्वाधिक जीएसटी मिळतो, मात्र परतावा अपुरा मिळतो. केंद्र व राज्य सरकारने मिळून महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना पंजाबच्या धर्तीवर मदत द्यावी.

कर्जमाफीच्या मुद्यावर टीका करताना थोरात म्हणाले, निवडणूक जिंकण्यासाठी कर्जमाफीची घोषणा केली जाते. मात्र नंतर त्यावर टाळाटाळ सुरू होते. आम्ही सत्तेत असताना एक लाखापर्यंतची कर्जमाफी दिली होती. त्यामुळे आजचे सरकार घोषणा करीत असेल, तर त्यांनी ती अमलात आणून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा. दरम्यान, धाराशिव जिल्ह्यातील कलेक्टर नाचगाणी करतो, हे सरकार किती गंभीर आहे याचे उदाहरण आहे, असे टीकास्त्र थोरात यांनी सोडले. त्यांनी ओला दुष्काळ तातडीने जाहीर करून मदत द्यावी, अन्यथा शेतकरी संताप व्यक्त करतील, असा इशाराही दिला.

Breaking News: Farmers are in great distress flood action Balasaheb Thorat

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here