थोरात कारखान्याकडून शेतकऱ्यांची दिवाळी गोड अन मोफत…..
Breaking News | Sangamner Sugar Factory: थोरात सहकारी साखर कारखान्याकडून या वर्षी दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर शेतकरी, कामगार आणि सभासदांसाठी दिलासादायक घोषणा करण्यात आल्या.

संगमनेरः सहकार क्षेत्रातील आदर्श संस्था म्हणून लौकिक मिळवलेल्या थोरात सहकारी साखर कारखान्याकडून या वर्षी दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर शेतकरी, कामगार आणि सभासदांसाठी दिलासादायक घोषणा करण्यात आल्या. कारखान्याचे मार्गदर्शक व माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही माहिती दिली.
शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण कायम ठेवत यंदा मागील हंगामासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना प्रति टन २०० रुपये आणि कारखान्याच्या कार्यक्षेत्राबाहेरील शेतकऱ्यांना प्रति टन १०० रुपये प्रोत्साहनपर रक्कम दिली जाणार आहे. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल, अशी माहिती थोरात यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
कारखान्याचे कामगारही दिवाळी आनंदाने साजरी करतील. २० टक्के बोनस आणि ३० दिवसांचे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयामुळे कारखान्यातील सर्व श्रमिक वर्ग आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
थोरात म्हणाले, कारखान्याने नेहमीच सहकार तत्त्वावर चालत शेतकरी आणि कामगारांचा विचार केला. यशस्वी कारभारामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट झाली असून, शहरातील बाजारपेठा ही सध्या खरेदीदारांनी गजबजलेल्या आहेत. मागील वर्षी १५ किलो साखर देण्यात येत होती, परंतु यंदा कारखान्याने दर शेअरसाठी ३० किलो मोफत साखर देण्याची घोषणा केली. थोरात म्हणाले, सभासदांचा विश्वास आणि सहकार्य हेच आमच्या वाटचालीचे बळ आहे. साखर वितरणासाठी सभासदांनी आपले डिजिटल कार्ड, सोसायटीचे हमीपत्र अथवा अधिकार पत्र घेऊन यावे, असे आवाहन कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले.
अमृत उद्योग समूहाअंतर्गत विविध संस्थांमार्फत जवळपास १०० कोटी रुपये बाजारात येत असल्यामुळे संगमनेर तालुक्यातील बाजारपेठा सध्या चैतन्याने भरल्या आहेत. शेतकरी, कामगार आणि व्यापारी वर्गासाठी ही दिवाळी भरभरून आनंदाची ठरणार आहे. या निर्णयामुळे शेतकरी, कामगार, सभासद आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये दिवाळीचा उत्सव द्विगुणित होणार असून, सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागात आर्थिक सशक्ततेचे उत्तम उदाहरण पुन्हा एकदा साकारले गेले आहे.
Breaking News: Farmers’ Diwali sweets and freebies from Thorat factory


















































