मे महिन्यातच अहिल्यानगर जिल्ह्यातील हे पहिले धरण ओव्हरफ्लो !
Breaking News | Ambit Dam Overflow: जिल्ह्यातील यावर्षीच्या पावसाळ्यात भरणारे आंबित धरण हे पहिले धरण.
अकोले: मुळा खोर्यात पाऊस कोसळत्त असल्याने या नदीवरील 193 दशलक्ष घनफूट क्षमतेचा आंबित तलाव काल मंगळवारी दुपारी 1 वाजता पूर्ण क्षमतेने भरला आहे, या तलावातून 150 ते 200 क्युसेकने नदीत विसर्ग सुरु आहे. आता खाली मुळा नदी वाहती झाली असून हे पाणी पिंपळगाव धरणात जमा होऊ लागले आहे. अकोले तालुक्यातील मुळापाणलोट क्षेत्रात गेल्या आठ दिवसांपासून मान्सून पूर्व पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे यामुळे मुळा नदी वाहती झाली असून या नदीवरील आंबित धरण काल मंगळवारी दुपारी ओव्हरफ्लो झाले आहे.
मुळा नदी उगमा जवळ आंबित गावात असणारे मुळा नदीवरील आंबित धरण असून अहमदनगर जिल्ह्यातील यावर्षीच्या पावसाळ्यात भरणारे आंबित धरण हे पहिले धरण आहे. मान्सून पूर्व दमदार एन्ट्रीने अकोले तालुक्यातील हे पहिले धरण भरले आहे.
उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा पाणलोटात काल मंगळवारी मान्सूनपूर्व पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी डोंगर-दर्यातून येणारे ओढे-नाले काही प्रमाणात खळखळत असून धरणात येणारी पाण्याची गती मंदावली आहे. दरम्यान, कृष्णवंती नदीवर असलेला 112 दलघफू क्षमतेचा वाकी तलाव निम्मा भरला आहे. गत आठ-दहा दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने मुक्काम ठोकला आहे. अधूनमधून कोसळणार्या या पावसामुळे भंडारदरा पाणलोट चिंब होऊन गेला आहे.
11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरात काल सायंकाळी 3007 दलघफू पाणीसाठा होता. धरणातून 780 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. 8028 दलघफू क्षमतेच्या निळवंडेत 2206 दलघफू पाणीसाठा होता. या धरणातून 370 क्युसेकने कॅनालसाठी पाणी सोडण्यात येत आहे. वाकी तलावात हळुवार पाणी येत आहे. गतवर्षीचाच 44 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने हे धरण यंदा लवकर निम्मे भरले आहे.
Breaking News: first Ambit dam in Ahilyanagar district overflowed in May itself.