अकोले तालुक्यातील प्रवरा नदीवरील रंधा धबधब्यावर होणार काचेचा पूल’; बांधकाम विभागाकडून संकल्पचित्र प्रसिद्ध
Breaking News | Akole: अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील प्रवरा नदीवरील रंधा धबधब्यावर होणार काचेचा पूल’; बांधकाम विभागाकडून संकल्पचित्र प्रसिद्ध.
अकोले : निसर्गसौंदर्य लाभलेल्या अकोले तालुक्यातील प्रवरा नदीवरील ‘रंधा फॉल’चे सौंदर्य आता अधिकच बहरणार आहे. हा धबधबा अधिक जवळून आणि सुरक्षित पाहता यावा, यासाठी धबधब्यावर लवकरच काचेचा पूल साकारला जाणार आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या कामाची निविदा आणि संकल्पचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. या कामास अंदाजे ४ कोटी ३१ लाख ९३ हजार ६१३ रुपये खर्च येणार असून, हे काम २४ महिन्यांत पूर्ण केले जाणार आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील प्रवरा नदीवरील रंधा धबधबा राज्यात प्रसिद्ध आहे. दरवर्षी हजारो पर्यटक या धबधब्याला भेट देतात. काही वर्षांपूर्वी माजी मंत्री दिवंगत मधुकरराव पिचड यांच्या प्रयत्नाने रंधा धबधबा सुशोभीकरणाची काही कामे झाली. धबधबा जेथून चांगला दिसतो, तेथे पोहोचण्यासाठी आकर्षक पूल झाला. नदीपात्रात निरीक्षण मनोरा, घाट, घोरपडा देवी मंदिराचे काम आदी मार्गी लागले.
आता आमदार लहामटे यांच्या प्रयत्नांतून धबधब्यावर काचेचा पूल होणार आहे. त्यामुळे धबधब्या इतकाच हा पूल पर्यटकांचे आकर्षण ठरणार आहे. आमदार डॉ. किरण लहामटे यांनी हा प्रकल्प मार्गी लावण्याचे तालुक्याच्या पर्यटन क्षेत्राचा विकास करण्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्या पाठपुराव्याने हा विषय मार्गी लागला आहे.
अकोले तालुक्याचा पर्यटन विकास करून रोजगार निर्मितीचा माझा मानस आहे. पर्यटन विकासातून तालुका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. त्यातीलच हे “स्काय वॉक” अर्थात काचेचा पूल एक पाऊल आहे. निविदा आणि या पुलाचे संकल्पचित्रही प्रसिद्ध केले आहे.
– डॉ. किरण लहामटे, आमदार
Breaking News: glass bridge will be built at Randha waterfall on Pravara river in Akole