संगमनेर शहरात 2 लाख 28 हजारांचा गुटखा जप्त
Breaking News | Sangamner: गुटख्याचा मोठा साठा जप्त केला आहे. शहर पोलिसांनी साडेनऊच्या सुमारास टाकलेल्या छाप्यात तब्बल 2 लाख 28 हजारांचा मुद्देमाल हस्तगत.

संगमनेर: संगमनेर शहरातील जनतानगर परिसरात पोलिसांनी मंगळवारी रात्री धडक कारवाई करत गुटख्याचा मोठा साठा जप्त केला आहे. शहर पोलिसांनी साडेनऊच्या सुमारास टाकलेल्या छाप्यात तब्बल 2 लाख 28 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, हुक्क्यासाठी लागणारे साहित्य सुद्धा पोलिसांनी जप्त केले आहे.
शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जनता नगर येथील प्रविण शंकर बत्तुल (रा. जनता नगर, संगमनेर) हा व्यावसायिकरित्या पानटपरी चालवितो. मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्याने आपल्या घरातच महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या गुटख्यासाठी लागणारी नशाकारक सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याचे विक्री करत होता. या व्यवसायासाठी लागणारे सर्व साहित्य त्याने घरातच साठवून ठेवले होते. गुप्त खबर्यामार्फत ही माहिती पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत, पो.हे.काँ. बाबासाहेब सातपुते, महिला पोलीस डुंबरे व इतर पथकातील अधिकारी यांनी मंगळवारी रात्री बत्तुल यांच्या घरावर छापा टाकला. या छाप्यात विविध प्रकारच्या सुगंधी तंबाखू, पानमसाला तसेच हुक्क्यासाठी लागणारे साहित्य पोलिसांनी हस्तगत केले. एकूण जप्त केलेल्या मालाची किंमत अंदाजे 2 लाख 28 हजार इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांपासून बत्तुल याने आपल्या घरातच हा अवैध धंदा सुरू ठेवला होता. शहरात अशा प्रकारचा धंदा दीर्घकाळ सुरु असूनही पोलिसांच्या नजरेतून कसा सुटला? असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. तथापि, अखेर गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई करत मोठा अवैध धंदा उध्वस्त केला आहे.
या प्रकरणी पो.कॉ. रामकिशन मुकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी प्रविण शंकर बत्तुल यास ताब्यात घेत अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत हे करत आहे. या कारवाईमुळे अवैध तंबाखू व्यवसाय करणार्यांमध्ये एकच खळबळ उडाली असून पोलिसांकडून अशा प्रकारच्या अवैध धंद्यांवर पुढील काळातही आणखी कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी सांगितले.
Breaking News: Gutkha worth Rs 2.28 lakh seized in Sangamner
















































