अहिल्यानगर: पावसाचं थैमान, जनजीवन विस्कळीत; नद्यांना पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला
Breaking News | Ahilyanagar Rain Flood: मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक नद्यांना आणि ओढ्यांना पूर आला.
राहाता: राहाता तालुक्यात आणि आसपासच्या परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. संततधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले आहे.
या अतिवृष्टीचा फटका नगर-मनमाड महामार्गावरील वाहतुकीला बसला आहे. राहाता ते शिर्डी दरम्यान महामार्गावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे.
प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन प्रशासनाने नागरिकांना या महामार्गावर प्रवास न करण्याचे तातडीचे आवाहन केले आहे. परिस्थिती सामान्य होईपर्यंत प्रवासासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा.
राहुरी: राहुरी तालुक्यात मागील १० तासांपासून सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक नद्यांना आणि ओढ्यांना पूर आला आहे. मुळा, देव, करपरा या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, काही ठिकाणी पूल पाण्याखाली गेले आहेत. मुळा धरणातून तब्बल २५,००० क्युसेसने विसर्ग सुरू करण्यात आल्याने नदीकाठच्या गावांमध्ये पूरपरिस्थिती गंभीर बनली आहे.
करपरा नदीला आलेल्या पुरामुळे परिसरातील अनेक आदिवासी कुटुंबांच्या झोपड्यांमध्ये व घरांमध्ये पाणी शिरले आहे. परिणामी या कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले असून, सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. तालुक्यातील ओढे-नाल्यांना पूर आल्याने शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी कपाशी, सोयाबीन,ऊस, मका आणि भाजीपाला पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला असून, दळणवळणाची साधने ठप्प झाली आहेत.
तालुक्यातील मुळानदीवरील कोंढवड, केदंळ व देवनदी वरील देसवंडी, सडे आदी पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच टाकळीमिया परिसरातील नाग ओढ्याला मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने ओढ्याकाठी राहणाऱ्या ७ ते ८ आदिवासी कुटंबे राहत असलेल्या वस्तीला पुराच्या पाण्याने विळखा घातला. शिवसेना शेतकरी आघाडीचे रविंद्र मोरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन दोरखंडाच्या मदतीने ३० ते३५ लोकांना पाण्यातून बाहेर काढून मोरवाडी येथील मराठी शाळेत सुरक्षित ठिकाणी आश्रय दिला. व वैद्यकिय मदत केली.
श्रीरामपूर ते देवळाली प्रवरा रस्त्यावर असलेल्या ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे. परिणामी श्रीरामपूरच्या इतर भागांशी सपंर्क तुटलेला आहे. काही ठिकाणी प्रवासी व वाहनचालक अडकून पडले आहे. हवामान विभागाने पुढील २४ तास पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, नदी-नाल्यांच्या परिसरात जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
नेवासा तालुक्यातील पश्चिमेकडील पाचेगाव परिसरात शनिवारी रात्री परतीच्या पावसाने धडक दिली. अवघ्या काही तासांत तब्बल १४४ मिमी (सुमारे ६ इंच) पावसाची नोंद झाली. या मुसळधार पावसामुळे गाव व परिसरातील ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागले आणि गावाचा दुपारी तीन वाजेपर्यंत सर्वदूर संपर्क तुटला.
प्रवरा नदीवरील मुख्य पूल पाण्याखाली गेल्याने सर्व प्रकारची वाहतूक ठप्प झाली आहे. पाण्याची पातळी झपाट्याने वाढून बाजारतळापर्यंत पाणी शिरले. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कृषी क्षेत्राला यामुळे मोठा फटका बसला आहे. परिसरातील शेतकऱ्यांचे सोयाबीन, कपाशी आणि कांद्याची रोपे पाण्यात बुडाली आहेत. ऊसाची पिके अक्षरशः जमिनदोस्त झाली आहेत. पावसाच्या तडाख्याने दोन घरांच्या भिंती कोसळल्या असून दोन शेतकऱ्यांच्या विहिरीही जमीनदोस्त झाल्या आहेत.
गावाकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर पाण्याचे साम्राज्य पसरले आहे. पाचेगाव-फाटा रस्ता, पाचेगाव-खिर्डी रस्ता आणि पाचेगाव-पुंटगाव रस्ते पाण्याखाली गेले असल्याने गाव पूर्णपणे अलगद झाले आहे. वाहतूक व हालचालींवर पूर्णपणे बंदी आली आहे.
अत्यंत गंभीर परिस्थिती स्मशानभूमीमध्ये दिसून आली. पाण्याने स्मशानभूमी गाठल्याने अंत्यसंस्कार करताना ग्रामस्थांना अक्षरशः पाण्यातून वाट काढत मृतदेह दफन करावा लागला.
Breaking News: Heavy rain disrupts normal life Rivers flood, many villages lose contact