Home अहिल्यानगर नगरमध्ये ‘हत्ती’चा धोधो पाऊस, नद्यांच्या विसर्गात वाढ,  पूरस्थितीचा धोका कायम

नगरमध्ये ‘हत्ती’चा धोधो पाऊस, नद्यांच्या विसर्गात वाढ,  पूरस्थितीचा धोका कायम

Breaking News | Ahilyanagar: पहिल्याच दिवशी ‘पडतील हत्ती तर कोसळतील भिंती’ या मराठी म्हणीप्रमाणे जिल्ह्याच्या विविध भागात दमदार पाऊस.

Heavy rains of 'Elephant', increase in river discharge, risk of flood continues

अहिल्यानगर:  शनिवार (दि. 27) पासून पावसाच्या हस्त नक्षात्राला सुरूवात झाली आहे. पहिल्याच दिवशी ‘पडतील हत्ती तर कोसळतील भिंती’ या मराठी म्हणीप्रमाणे जिल्ह्याच्या विविध भागात दमदार पाऊस झाला. दुपारी चार वाजता सुरू झालेला पाऊस रात्री उशीरापर्यंत बरसत होता. दरम्यान, हवामान खात्याने रविवारी देखील मुसळधार पावसाचा यलो अर्लट दिलेला आहे. यामुळे संभाव्य निर्माण होणार्‍या परिस्थितीवर निर्णय घेण्यासाठी प्रशासन सर्तक असल्याचे सांगण्यात आले. शनिवारी रात्री जिल्ह्याच्या बहुतांशी भागात हस्त नक्षत्राचा मुसळधार पाऊस झाल्याचे वृत्त होते.

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोसळणार्‍या पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या विसर्गात वाढ करण्यात आला असून जिल्ह्यात नदी काठावर पूरस्थितीचा धोका कायम आहे. पुणे, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढला असून त्यामुळे जिल्ह्यातून वाहणार्‍या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.

शनिवारी सायंकाळीपर्यंत भिमा नदीवर दौंड पूल येथे 8 हजार 222 क्युसेक, गोदावरी नदीवरील नांदूर मध्यमेश्वर धरणातून 12 हजार 620 क्युसेक, जायकवाडी धरणातून 37 हजार 728 क्युसेक, प्रवरा नदीवरील भंडारदरा धरणातून 820 क्यूसेक, निळवंडे धरणातून 1,521 क्यूसेक, ओझर बंधारा 1 हजार 498 क्युसेक, मुळा धरणातून 5 हजार क्युसेक, घोड धरणातून 5 हजार क्युसेक, हंगा नदी विसापूर धरण 550 क्यूसेकख, सीना धरणातून 3 हजार 558 क्युसेक, कुकडी नदीवरील येडगांव धरणातून 600 क्युसेक, खैरी धरण येथून 5 हजार 233 इतका विसर्ग सुरू होता. दुपार चारनंतर जिल्ह्यात अनेक भागात पावसाला सुरूवात झाली. यामुळे नद्यामधील पाण्याचा विसर्ग वाढणार असल्याची शक्यता निर्माण झाली होती. जिल्ह्यात निर्माण होणार्‍या पूर परिस्थितीवर नियंत्रण मिळता यावेत, यासाठी शुक्रवारी जिल्हाधिकार्‍यांनी जिल्ह्यातील सर्व अधिकार्‍यांना मुख्यालय न सोडण्याचे आदेश दिलेले आहेत. यासह पडणार्‍या पावसावर आणि नदीत सोडण्यात आलेल्या पाण्याच्या परिस्थितीवर जिल्हा प्रशासनान लक्ष ठेवून होते.

शनिवारपासून पावसाच्या हस्त नक्षत्राला सुरूवात झाली आहे. पावसाळ्यात सर्वाधिक पाऊस पडणारे नक्षत्र म्हणून हस्तनक्षाकडे पाहिले जाते. या नक्षात्र पडणारा पाऊस हा इतका भयंकर असतो की त्यात घराच्या भिंती देखील शिल्लक राहत नाहीत, अशी पूर्वीपासूनची म्हण आहे. हस्तनंतर स्वाती आणि चित्र हे पावसाचे आता दोनच नक्षत्र शिल्लक आहे. साधारणपणे हस्त नक्षत्राच्या शेवटच्या टप्प्यात परतीचा पाऊस आटोपते घेत असल्याचा अंदाज आहे. मात्र, नगर जिल्ह्यात यापूर्वी दिवाळीपर्यंत पावसाचा मुक्काम राहिल्याचा अनुभव आहे. दरम्यान, शनिवारी नवरात्रीच्या सहाव्या माळेच्या दिवशी विविध ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी जाणार्‍यांचे हाल झाले. दुपारी चारनंतर दमदार पावसाला सुरूवात झाली. साधारणपणे एक ते पाऊण तासाच्या पावसानंतर अर्ध्या तासाच्या विश्रांतीनंतर पुन्हा मुसळधार पावसाला सुरूवात झाली. रात्री आठवाजेपर्यंत पावसाचा जोर कायम होता. मुसळधार पावसामुळे नगर शहरातील अनेक सखल भागात पाणी साठण्यास सुरूवात झाली होती.

शनिवार आणि यंदाचे नक्षत्र

8 जून मृग नक्षत्र (रविवार),22 जून आर्द्रा नक्षत्र (रविवार), 5 जुलै पुनर्वसू नक्षत्र (शनिवार), 19 जुलै पुष्य नक्षत्र (शनिवार), 2 ऑगस्ट आश्लेषा नक्षत्र (शनिवार), 16 ऑगस्ट मघा नक्षत्र (शनिवार), 30 ऑगस्ट पूर्वा नक्षत्र (शनिवार), 13 सप्टेंबर उत्तरा नक्षत्र (शनिवार), 27 सप्टेंबर हस्त नक्षत्र (शनिवार), 10 ऑक्टोबर चित्रा नक्षत्र (शुक्रवार) आणि 24 ऑक्टोबर स्वाती नक्षत्र (शुक्रवार).

मूळा धरणाचा विसर्ग दुप्पट

शनिवारी सकाळी आधी मूळा धरणातून सोडण्यात येणार्‍या पाण्याचा विसर्ग हा 2 हजार क्यूसेक होता. दुपारी तीन वाजता तो पाच हजार करण्यात आला. सायंकाळी हा विसर्ग 15 हजार करण्यात आला असल्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने कळवण्यात आले. रात्री पाऊस सुरू राहिल्यास हा विसर्ग वाढवण्यात येण्याची शक्यता असून यामुळे मुळा काठावर पूराच्या पाण्याचा धोका वाढला आहे.

राज्यातील परतीच्या पावसाबाबत हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी याबाबत अधिक माहिती देतांना सांगितले की, अपेक्षित असलेल्या कमी दाबाचे शनिवारी पहाटे तीव्र कमी दाबात रूपांतर झाले आहे. यामुळे महाराष्ट्रात दसर्‍यापर्यंत राहण्याची शक्यता असणार्‍या जोरदार पावसाला ही प्रणाली पूरक ठरण्याची शक्यता कायम आहे. दरम्यान, हवेच्या तीव्र कमी दाब वातावरण प्रणालीच्या नेमक्या प्रभावी टप्प्यात सापडलेल्या दक्षिण मराठवाड्यातील जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी तसेच सोलापूर जिल्हा क्षेत्रात मंगळवार 30 सप्टेंबर पासून 2-3 दिवस पावसासाठी काहीशी उघडीप मिळू शकते.

मात्र, संपूर्ण मराठवाडा, विदर्भ व जळगाव, नाशिक, अहिल्यानगर व सोलापूर या महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यात, मंगळवार 30 सप्टेंबरपर्यंतच्या 4 दिवसात पूरजन्य परिस्थितीची शक्यता जाणवते. तसेच धरण क्षेत्रातून नद्यांच्या पात्रात पुन्हा एकदा पूर पाण्याच्या विसर्गाची शक्यता आहे. अंदमानजवळ तयार होणारे कमी दाबाचे क्षेत्र वायव्येकडे सरकणार आहे. यामुळे मंगळवार 30 सप्टेंबरदरम्यान अंदमानजवळ बंगाल उप सागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता व त्याचे उत्तर व उत्तरमध्य भारताकडे होण्याच्या मार्गक्रमण शक्यतेतून महाराष्ट्रात 8-9 ऑक्टोबर दरम्यानच्या पावसाच्या चौथ्या आवर्तनाच्या धोका कमी जाणवतो.

Breaking News: Heavy rains of ‘Elephant’, increase in river discharge, risk of flood continues

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here