Home महाराष्ट्र चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच पत्नीचा गळा आवळून खून, घाटात मृतदेह फेकला

चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच पत्नीचा गळा आवळून खून, घाटात मृतदेह फेकला

Breaking News | Indapur Crime: चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच पत्नीचा गळा आवळून खून करून इंदापूर पासून 300 किलोमीटर अंतरावर नाशिकच्या नांदगाव घाटात मृतदेह फेकला.तीन महिन्यांनी उलगडा.

Husband strangles wife to death over suspicion of character

इंदापूर : चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच पत्नीचा गळा आवळून खून करून इंदापूर पासून 300 किलोमीटर अंतरावर नाशिकच्या नांदगाव घाटात मृतदेह फेकला. त्यानंतर स्वतःच पत्नी हरवल्याची तक्रार इंदापूर पोलिसांत दिली होती. दरम्यान, तब्बल तीन महिन्यानंतर पोलिसांनी खुनाचा उलगडा करत आरोपी पतीसह आणखी एकाच्या मुसक्या आवळल्या.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, इंदापूर तालुक्यातील चितळकरवाडी येथील प्रियंका शिवाजी चितळकर हिचा 2013 साली इंदापूर तालुक्यातील कळाशी येथील ज्योतीराम करे याच्याशी विवाह झाला होता. त्यानंतर त्यांना दोन अपत्य ही झाली. दरम्यान, मागील काही महिन्यांपासून ज्योतीराम करे याचा पत्नी प्रियंकाच्या चरित्रावर संशय होता. यातून दोघांत वाद व्हायचे. त्यानंतर 29 जानेवारी 2025 रोजी ज्योतीराम करे याने इंदापूर पोलिसांत आपली बायको बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.

त्यानंतर इंदापूर पोलिसांनी तपास सुरू केला. मात्र, ही महिला हरवली नाही, तर तिचा खून झाला असावा, असा संशय पोलिसांचा वाढला आणि पोलिसांनी त्या दृष्टीने आपली पावले टाकली. ज्योतीराम करे हा सातत्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होता. शेवटी पोलिसांपुढे त्याचे काही चालले नाही. पोलीस त्याला घेऊन नाशिकच्या नांदगाव परिसरातील डोंगर घाटात पोहचले आणि तब्बल दीडशे फूट खोल दरीत फेकलेला कुजलेल्या अवस्थेतील प्रियंकाचा सांगाडा पोलिसांनी बाहेर काढला.

ज्योतीराम करे हा साखर कारखान्याला ऊस पुरवठा करणारा ट्रॅक्टर चालवतो. त्यामुळे त्याला या परिसराची चांगली माहिती होती. हे हत्याकांड करण्यापूर्वी त्याने या भागाची रेकी केली होती. आपल्या आणखी एका मित्राच्या सहाय्याने त्याने नांदगावच्या डोंगरदरीत प्रियंकाचा मृतदेह फेकला. प्रियंकाचा शोध लावणे, हे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान होते. मात्र, तीन महिन्यानंतर पोलिसांनी प्रियंका हरवली नाही. तर तिची हत्या झाली याचा तपास लावला आणि थेट प्रियंकाचा सांगाडाच पोलिसांच्या हाती लागला. याप्रकरणी इंदापूर पोलिसांनी ज्योतीराम करे आणि दत्तात्रय गोलांडे या दोघांना जेरबंद करण्यात आले आहे.  अधिक तपास पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे करत आहेत.

Breaking News: Husband strangles wife to death over suspicion of character

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here