राजूरमध्ये कावीळ आजाराचे थैमान, तरुणीचा कावीळमुळे मृत्यू
Breaking News | Akole: राजूरसह परिसरात सुरू असलेल्या काविळीच्या साथीचा पहिला बळी गेला.
राजूर | अहिल्यानगर: अकोले तालुक्यातील राजूर गावात कावीळ आजाराने थैमान घातले आहे. कावीळ या आजाराशी दोन हात करीत असताना राजूर येथील एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे राजूरसह परिसरात सुरू असलेल्या काविळीच्या साथीचा पहिला बळी आज गेला.
प्रियंका हरिभाऊ शेंडे (वय २०) असे मृत तरुणीचे नाव आहे. या आजाराने लोक धास्तावले आहेत. आज आठवडा बाजारही बंद ठेवण्यात आला आहे. गेल्या १५ दिवसांपासून कावीळ आजाराने थैमान घातले आहे. दुषित पाण्यामुळे शेकडो नागरिक बाधित झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. प्रशासनाने उपाययोजना सुरु केल्या आहे. बाहेरून पथक मागविण्यात आले आहे.
प्रियंका शेंडे हिच्यावर संगमनेर येथील एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. तिच्या मेंदूत कावीळ गेल्यामुळे प्रियांकाचा मृत्यू झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्याम शेटे यांनी दिली.
एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यानंतर राजूरमध्ये काविळीचे रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली. काविळीचे काही रुग्ण खासगी दवाखान्यात दाखल झाले होते. गावातील पाण्याच्या उपचार केंद्राच्या कार्यक्षमतेत असलेल्या त्रुटींमुळे हा प्रादुर्भाव झाल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी येथे भेट दिल्यानंतर आढळून आले होते. त्यांनी तत्काळ या केंद्राची स्वच्छता आणि दुरुस्तीबाबत सूचना दिल्या. त्यानंतर पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीची स्वच्छता सुरू झाली. मात्र त्यानंतरही ही साथ सुरूच राहिली.
Breaking News: Jaundice outbreak in Rajur, young woman dies due to jaundice