ड्राय डे च्या दिवशी संगमनेरातून दारू वाहतूक
Breaking News | Sangamner: ड्राय डे च्या दिवशी दारू विकण्याच्या उद्देशाने एक व्यक्ती दारूची वाहतूक करत असल्याची माहिती संगमनेर शहर पोलिसांना मिळाल्याने पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये 3 लाख 35 हजार 360 रुपयांच्या मुद्देमाल जप्त.
संगमनेर: ड्राय डे च्या दिवशी दारू विकण्याच्या उद्देशाने एक व्यक्ती दारूची वाहतूक करत असल्याची माहिती संगमनेर शहर पोलिसांना मिळाल्याने पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये 3 लाख 35 हजार 360 रुपयांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी शाहूनगर (अकोले) येथील राजेश बबन शिंदे याला दारूची वाहतूक करताना पकडण्यात आले. संगमनेर पोलिसांची अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांवर ही मोठी कारवाई मानली जात आहे.
शनिवारी (9 ऑगस्ट) अकोले तालुक्यात जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या अनुषंगाने प्रशासनाने अकोलेमध्ये ‘ड्राय डे’चे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर राजेश बबन शिंदे (वय 40 वर्ष, रा. शाहूनगर, अकोले, ता. अकोले, जि. अहिल्यानगर) हा संगमनेर मधून अकोल्याकडे दारू वाहतूक करणार असल्याबाबतची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांच्या आदेशावरून शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब लोखंडे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल कर्पे, हरिश्चंद्र पांडे आत्माराम पवार यांच्या पथकाने संगमनेर खुर्द येथे आरोपीला पकडण्यासाठी शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता सापळा लावला होता.
पोलिसांनी एका संशयित वाहनाला थांबवून तपासणी केली. तपासणीदरम्यान, मारुती कंपनीच्या सिल्व्हर रंगाच्या व्हॅनमधून (क्रमांक एमएच 14 एक्स 6510) 3 लाख 35 हजार 360 रुपये किमतीचा देशी दारूचा साठा मिळून आला. पोलिसांनी तातडीने दारूसाठा आणि वाहन जप्त केले. याप्रकरणी, अवैध दारूची वाहतूक करणारा आरोपी विशाल बबन शिंदे याला ताब्यात घेण्यात आले आहे. यासंदर्भात संगमनेर शहर पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर 738 दारूबंदी अधिनियम 1949 च्या कलम 65 (अ) (ई) नुसार गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रावसाहेब लोखंडे करत आहे.
Breaking News: Liquor transportation through Sangamnera on Dry Day