संगमनेर: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास दहा वर्षांचा कारावास
Breaking News | Sangamner Crime: नालासोपारा येथे नेत शारीरिक अत्याचार.
संगमनेर : अल्पवयीन मुलीला पुणे आणि नालासोपारा येथे नेऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार करणाऱ्या ३२ वर्षीय आरोपीला न्यायालयाने दहा वर्ष सश्रम कारावास आणि सात हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास एक वर्ष कैद अशी शिक्षा सुनावली. हा निकाल बुधवारी (दि.२०) येथील अतिरिक्त सह जिल्हा न्यायालय आणि अतिरिक्त सत्र न्यायालयात न्यायाधीश डी. एस. घुमरे यांनी दिला.
बाळासाहेब जगन्नाथ रोकडे (वय ३२, रा. श्रीरामनगर, संगमनेर) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. १३ मार्च २०१९ला पीडित मुलगी ही घरातून मैत्रिणीच्या बँकेतील कामासाठी तिच्यासोबत जाऊन येते असे सांगून गेली होती. मुलीचा शोध घेतला असता ती मिळून न आल्याने १४ मार्चला शहर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीने तिचे अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर १५ मार्चला अनोळखी मुलाचे मोबाइल क्रमांकावरून पीडित मुलीने तिच्या कुटुंबीयांना फोन करीत नालासोपारा येथे असल्याचे सांगितले. तिच्या आईने तिला नजीकच्या पोलिस ठाण्यात जाण्यास सांगितले. तेथील स्थानिक मुलांच्या मदतीने पीडिता पोलिस ठाण्यात पोहोचली, तिला पोलिसांच्या मदतीने संगमनेर येथे आणण्यात आले.
ज्यूसमधून दिले मादक द्रव्य
पीडित मुलीला आरोपीने गार्डनमध्ये नेले होते, तेथे ज्यूसमधून काही मादक द्रव्य प्यायला दिल्याने तिला त्रास होऊन चक्कर आल्यासारखे वाटू लागले. तिला रात्री दहा वाजता जाग आल्यानंतर ती पुणे येथे एका लॉजवर होती. रात्री जेवण करून ती झोपी गेली, सकाळी उठली असता तिच्या पायावर ओरखडे होते. त्यानंतर रोकडे याने पीडितेला रेल्वेने नालासोपारा येथे नेले, तेथेदेखील त्याने तिच्यावर अत्याचार केले. पोलिस निरीक्षक अभिजित लांडे यांनी तपास करीत न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले होते.
Breaking News: Man sentenced to ten years in prison for raping minor girl