एकाच मुलीवर दोघांचे प्रेम, रक्तरंजित थरार
Breaking News | Pune Crime: प्रेमाच्या मार्गात अडथळा नको म्हणून एका तरुणाने एका १७ वर्षांच्या मुलाचा खून.

देहूरोड : एकाच मुलीवर दोघांचे प्रेम होते. प्रेमाच्या मार्गात अडथळा नको म्हणून एका तरुणाने एका १७ वर्षांच्या मुलाचा खून केला. तसेच त्याच्या चुलत भावावरही वार करून गंभीर जखमी केले. ही घटना बुधवारी (दि. ११ जून) रात्री साडेदहाच्या सुमारास थॉमस कॉलनी, देहूरोड परिसरात घडली. ह्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दिलीप मौर्या (वय १७, रा. थॉमस कॉलनी, देहूरोड) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तर, अरूण सुखराम मौर्या (वय १५ रा. थॉमस कॉलनी, देहूरोड) जखमी झाला असून त्याने याबाबत देहूरोड पोलिसांत फिर्याद दिली आहे. सनी सिंग (सध्या रा. देहूरोड, मुळ रा. गंभीरपूर, ता. शिवना, जि. गोपालगंज, रा. बिहार) असे आरोपीचे नाव असून तो फरार आहे.
पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सनी सिंग याच्या मै.त्रिणीसोबत दिलीप मौर्या याचे प्रेम संबंध होते. त्याचा राग मनात धरून सनीने दिलीप मौर्या यास बुधवारी (दि. ११) रात्री साडेदहाच्या सुमारास थॉमस कॉलनी, देहूरोड येथे बोलावून घेतले.
रात्रीची वेळ असल्याने दिलीपने चुलत भाऊ अरुण यालाही सोबतीला बोलावून घेतले. तिथे सनी आणि दिलीप यांच्यात प्रेमसंबंधाच्या कारणातून वाद झाला. त्या वादातून सनीने दिलीपच्या गळ्यावर चाकूने वार केला, त्यावेळी चुलत भाऊ अरूण मध्ये आला म्हणून सनी याने अरुणच्याही छातीवर वार केला आणि तिथून पळ काढला.
गंभीर जखमी अरूणला उपचारार्थ देहूरोड कॅन्टोन्मेंट रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिलीप मौर्या याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. तसेच फरार आरोपी सनी सिंग याच्या शोधार्थ पोलीस ठाण्यातील पथके रवाना केली आहेत.
Breaking News: Murder Two people’s love for the same girl, bloody thrill


















































