अहिल्यानगर: तब्बल साडे चार टन बंदी असलेले मांगूर मासे पकडले
Breaking News | Ahilyanagar: मानवी शरीरास अपायकारक असलेले व देशात बंदी असलेले मांगूर जातीचे साडेचार टन वजनाचे मासे राहाता पोलिसांनी ताब्यात. ट्रक घेतला ताब्यातः चौघावर गुन्हा दाखल, मध्यप्रदेशात जाणार होते.
राहाता : पर्यावरणासह मानवी शरीरास अपायकारक असलेले व देशात बंदी असलेले मांगूर जातीचे साडेचार टन वजनाचे मासे राहाता पोलिसांनी ताब्यात घेतले. भिगवण येथून मालवाहू ट्रकमधून हे मासे मध्य प्रदेशात नेले जात होते. पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत हा मालट्रक ताब्यात घेतला. याप्रकरणी ट्रकचालकासह इतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून राहाता पोलिसांनी नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने खड्डे घेऊन माशांची विल्हेवाट लावली.
शिर्डीचे उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर अवैध गोवंश वाहतूक
कारवाईच्या अनुषंगाने राहात्याचे पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक योगेश शिंदे, किरण साळुंखे, सहायक फौजदार प्रभाकर शिरसाठ हे पथकासह शुक्रवारी (दि. ६) चितळी चौकात नाकाबंदी करीत होते. या दरम्यान ट्रक (क्र. आरजे. २५, जीए. ६०५८) अहिल्यानगरकडून शिर्डीच्या दिशेने संशयितरीत्या जाताना दिसून आला.
याप्रकरणी सादाब हकीम खान (वयः २५, रा. नेताजी धरमपुरी, ता. धरमपुरी, जि. धार, मध्य प्रदेश), मांगीलाल नाथूलाल कहार (वय ३५, रा. राजगड, ता. सरदारपूर, जि. धार, मध्य प्रदेश), नरसिंहा मुंग्रा (रा. भिगवण, जि. पुणे) व कमल चौहान (रा. राजगड, जि. धार, मध्य प्रदेश) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चालकाकडून उडवाउडवीची उत्तरे
ट्रक चालकास विचारणा केली असता तो उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागला. त्यानंतर प्रभारी सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी प्रतीक्षा पाटेकर यांना बोलावून खात्री केली असता ट्रकमध्ये तब्बल ४ लाख ६० हजार रुपये किमतीचे सुमारे ४ हजार ६०० किलो वजनाचे मांगूर मासे मिळून आले. पंचनामा करुन पोलिसांनी माशांची विल्हेवाट लावली.
Breaking News: Nearly four and a half tons of banned mangoor fish caught