वाढदिवसादिवशीच पत्नीवर विळ्याने वार, विळ्याने आपला गळा चिरून आत्महत्या
Breaking News | Kolahpur Crime: वाढदिवसादिवशीच पत्नी राधिकावर धारदार विळ्याने वार करून तिला गंभीर जखमी केले. यानंतर कृष्णा याने विळ्याने आपला गळा चिरून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मलकापूर : सावे (ता. शाहूवाडी) येथे पती व पत्नीच्या घरगुती वादातून कृष्णा शिवाजी झेंडे (वय ४७) याने आपल्या वाढदिवसादिवशीच पत्नी राधिकावर धारदार विळ्याने वार करून तिला गंभीर जखमी केले. यानंतर कृष्णा याने विळ्याने आपला गळा चिरून आत्महत्या केली. या घटनेची नोंद शाहूवाडी पोलिसांत झाली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. दरम्यान, राधिकाला पुढील उपचारासाठी सीपीआरमध्ये पाठविले आहे.
अधिक महिती अशी की, सावे येथील कृष्णा झेंडे मुंबई येथे खासगी कंपनीत नोकरी करीत होते. ते चार दिवसांपूर्वी सुट्टीवर गावी आले होते. कृष्णा यांचा शुक्रवारी वाढदिवस होता. घरात वाढदिवस साजरा करायची तयारी सुरू असताना कृष्णा व पत्नी राधिका यांच्यात घरगुती वादातून कडाक्याचे भांडण झाले. कृष्णा याला राग अनावर झाल्याने त्याने गवत कापण्याच्या धारदार विळ्याने राधिकावर चार ते पाच वार केले. पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून कृष्णाने विळ्याने आपलाही गळा चिरून आत्महत्या केली.
दोघांच्या भांडणाचा आवाज ऐकून शेजारील ग्रामस्थ जमा झाले. या घटनेची महिती शाहूवाडी पोलिसांना मिळताच पोलिसांनी राधिका व कृष्णा या दोघांना मलकापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. राधिका हिच्यावर प्राथमिक उपचार करून तिला सीपीआरमध्ये पाठविण्यात आले. कृष्णा झेंडे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. कृष्णा याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई असा परिवार आहे.
कृष्णा झेंडे याचा शुक्रवार १३ जून रोजी वाढदिवस होता. सावे गावातील तरुणांच्या मोबाइलवर व सोशल मीडियावर कृष्णा झेंडेचे फोटो झळकत होते. वाढदिवस साजरा करायच्या अगोदर त्याने पत्नीवर हल्ला केला. नंतर स्वतःला संपविले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
Breaking News: On his birthday, he attacked his wife with a sickle, then committed suicide