अकोले: पेट्रोल व डिझेल बेकायदा ठिकाणावर छापा
Breaking News | Akole Crime: पेट्रोल व डिझेल बेकायदा साठवून व विक्री करणार्या ठिकाणावर अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नुकताच छापा टाकून 6 लाख 41 हजार 370 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
अकोले: अकोले तालुक्यातील वारंघुशी येथे पेट्रोल व डिझेल बेकायदा साठवून व विक्री करणार्या ठिकाणावर अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नुकताच छापा टाकून 6 लाख 41 हजार 370 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती काढून समूळ उच्चाटन करण्याचे आदेश दिलेले आहेत.
त्यानुसार गुन्हे शाखेचे पोहेकॉ गणेश लबडे, पोना. राहुल डोके, श्यामसुंदर जाधव, पोकॉ. मनोज साखरे, पोहेकॉ. भांड यांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून वारंघुशी येथे छापा टाकला असता पांडुरंग लक्ष्मण सदगीर (वय 40) याच्या घरासमोर प्लास्टिक ड्रममध्ये अवैधरित्या विक्रीकरीता ठवेलेले पेट्रोल व डिझेल ठेवले असल्याचे मिळून आले. यामुळे इतरांच्या जीवितास धोका निर्माण होईल, याची जाणीव असताना देखील पेट्रोल व डिझेल विक्री करण्याकरीता साठा करुन बाळगताना मिळून आला.
याबाबत अधिक विचारणा केली असता, सदरचे पेट्रोल व डिझेल हे लक्ष्मण ऊर्फ पांडू तान्हाजी घोंगडे (रा. पाडळी, ता. इगतपुरी, जि. नाशिक) यांच्याकडून कमी भावामध्ये विकत घेत असल्याचे सांगितले. या कारवाईत पेट्रोल व डिझेलने भरलेले 6 प्लॅस्टिक ड्रम आणि पिकअप असा एकूण 6 लाख 41 हजार 370 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोना. राहुल डोके यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वरील दोन्ही आरोपींविरुद्ध राजूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
Breaking News: Raid on illegal petrol and diesel places