प्रेमसंबंधातील वादाने टोक, रील्स स्टार महिलेने केली प्रियकराची हत्या
Breaking News | Pune Crime: प्रेमसंबंधातील वादाने टोक गाठल्यामुळे मावळ तालुक्यातील इंदोरी गावात हे धक्कादायक हत्याकांड घडल्याची माहिती.
पुणे: सोशल मीडियावरील रील्स स्टार असलेल्या महिलेने प्रियकराची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार Pune Crime उघडकीस आला आहे. प्रेमसंबंधातील वादाने टोक गाठल्यामुळे मावळ तालुक्यातील इंदोरी गावात हे धक्कादायक हत्याकांड घडल्याची माहिती आहे. पोलिसांनी संशयित महिला संध्या पवार हिला ताब्यात घेत पुढील तपास सुरु केला आहे.
30 वर्षीय महिलेने प्रेमसंबंधातून झालेल्या भांडणातून तरुणाचे हातपाय बांधले. त्यानंतर क्रिकेटच्या बॅटने अमानुष मारहाण करत त्याचा खून केला. ही घटना 12 जून 2025 रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
कमल रामदयाल मधुकर, वय 30 वर्ष, मूळ रा. छत्तीसगड, असे मृत तरुणाचे नाव असून या प्रकरणी कमलच्या बहिणीने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरुन संध्या पवारच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी तिला अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमल आणि संध्या पवार हिचे गेल्या काही दिवसांपासून प्रेम संबंध होते. कमल गुरुवार 12 जून रोजी रात्री त्या महिलेच्या घरी गेला असता दोघांमध्ये प्रेमसंबंधावरून जोरदार वाद झाला. वाद टोकाला गेल्याने संतप्त झालेल्या महिलेने कमलचे हातपाय बांधले आणि क्रिकेटच्या बॅटने त्याला बेदम मारहाण केली.
या मारहाणीत कमल गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच तो मृत झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. या घटनेने इंदोरी गावात खळबळ उडाली आहे. प्रेमसंबंधातील मतभेद इतक्या क्रूर कृत्यापर्यंत जाऊ शकतात, यावर विश्वास बसत नसल्याचे गावकरी सांगत आहेत.
Breaking News: Reels star woman kills boyfriend over love dispute