संगमनेर आमदार हल्ला प्रकरणाला वेगळ वळण! वारंवार पोलिस गाड्या पाठवून माझ्या मुलाला धमकावलं, त्याला ब्लॅकमेल केलं’; आरोपीच्या आईची तक्रार
Breaking News | Sangamner MLA Amol Khatal: घटनेमागे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप आमदार खताळ समर्थकांनी केला असून त्यांनी मोर्चा काढला होता. मात्र, आता आरोपी प्रसाद गुंजाळची आई अनिता गुंजाळ यांनी केलेल्या धक्कादायक आरोपांमुळे नव्या चर्चांना उधाण.

संगमनेर: संगमनेरचे शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी प्रसाद गुंजाळ या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमागे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप आमदार खताळ समर्थकांनी केला असून त्यांनी मोर्चा काढला होता. मात्र, आता आरोपी प्रसाद गुंजाळची आई अनिता गुंजाळ यांनी केलेल्या धक्कादायक आरोपांमुळे नव्या चर्चांना उधाण आले आहे.
अनिता गुंजाळ यांनी संगमनेर पोलिसांकडे दिलेल्या लेखी तक्रारीत म्हटलं आहे की, “ही घटना दुर्दैवी आहे, याचं मी समर्थन करत नाही; पण या घटनेचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. आमदार अमोल खताळ यांनी माझ्या मुलाची आर्थिक फसवणूक केली असून त्यातूनच हा प्रकार घडला आहे. त्यांनी माझ्या मुलाकडून सह्या केलेले कोरे चेक घेतले. त्यामुळे प्रसाद गेल्या वर्षभरापासून मानसिक तणावात होता.”
अनिता गुंजाळ यांच्या मते, अमोल खताळ यांनी वारंवार पोलिस गाड्या पाठवून प्रसादला धमकावलं, ब्लॅकमेल केलं आणि सतत दबाव टाकला. त्यामुळे त्याने अनेक वेळा आत्महत्येचाही विचार केला होता. प्रसाद गुंजाळ आणि अमोल खताळ हे अनेक वर्षांपासून जिवलग मित्र होते. ते कौटुंबिक समारंभ, वाढदिवस एकत्र साजरे करत असत. आर्थिक व्यवहारात झालेल्या वादामुळे प्रसाद उद्विग्न अवस्थेत गेला. पैसे चेकने परत करूनही त्याच्याकडे असलेले चेक पुन्हा टाकून त्याची फसवणूक करण्यात आली, असा दावा तक्रारीत केला आहे.
“माझा मुलगा चुकीचं पाऊल उचलला, त्याचं मी समर्थन करत नाही. पण, त्याला या टोकापर्यंत नेणाऱ्यांना मी आई म्हणून कधीही माफ करणार नाही. आज आमच्या कुटुंबाची बदनामी झाली आहे. गावात, नातेवाईकांत आम्हाला नावं ठेवली जात आहेत. आमच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे. आमचं काही वाईट झाल्यास त्याला आमदार अमोल खताळ आणि त्यांचे सहकारी जबाबदार असतील,” असं अनिता गुंजाळ यांनी आपल्या तक्रारीत स्पष्ट केलंय.
Breaking News: repeatedly sent police cars to threaten my son and blackmailed him


















































