संगमनेरमध्ये राजकारणाचा ‘कट’! माजी मंत्री बाळासाहेब थोरातांच्या प्रयत्नातून मंजूर केलेले 40 कोटींचे रस्ते प्रकल्प रद्द; तालुक्यात संतापाची लाट
Breaking News | Sangamner | Balasaheb Thorat on MLA Amol Khatal: तालुक्यातील विविध 8 रस्त्यांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 40 कोटी रुपयांचा निधी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंजूर करून घेतला होता. मात्र नवीन लोकप्रतिनिधीने आठ महिन्यात एक रुपयाचा निधी न आणता राजकारणासाठी मंजूर रस्त्यांची कामे रद्द करून….
संगमनेर: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सततच्या विकास कामांमधून संगमनेर तालुका हा राज्यात अग्रेसर बनवला. संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा आहे. या तालुक्यातील विविध 8 रस्त्यांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 40 कोटी रुपयांचा निधी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंजूर करून घेतला होता. मात्र नवीन लोकप्रतिनिधीने आठ महिन्यात एक रुपयाचा निधी न आणता राजकारणासाठी मंजूर रस्त्यांची कामे रद्द करून दुर्दैवी राजकारण केले असल्याची टीका संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर पाटील खेमनर यांनी केली असून मर्जीतील ठेकेदारांना सांभाळण्यासाठी केलेल्या या उद्योगाने तालुक्यात संतापाची लाट निर्माण झाली आहे.
तालुक्यातील विविध गावांमधील रस्त्यांसाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी 13 मार्च 2024 रोजी ग्रामविकास विभागाकडे संगमनेर तालुक्यातील विविध 8 रस्त्यांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत समावेश होऊन या रस्त्यांचे कॉन्टिटीकरण करावे याकरता मागणी केली होती. यानुसार शासन पत्र 4 ऑक्टोबर 2024 नुसार टप्पा दोन (बॅच १) च्या निर्णयानुसार 40 कोटी 73 लाख 81 हजार रुपये निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.
यामध्ये डिग्रस ते रणखांबवाडी 2.50 किलोमीटरसाठी 3 कोटी 53 लाख 97 हजार, चिखली ते जवळेकडलग 4.600 किलोमीटरसाठी 6 कोटी 31 लाख 89 हजार, खरशिंदे ते खांबे रस्ता दोन किलोमीटरसाठी 2 कोटी 45 लाख 96 हजार रुपये, मिर्जापुर ते धांदरफळ खुर्द रस्ता 4.26 किलोमीटरसाठी 5 कोटी 66 लाख 66 हजार रुपये, पारेगाव खुर्द ते तिगाव वडझरी रस्ता 5.030 किलोमीटरसाठी 6 कोटी 1 लाख 42 हजार रुपये, साकुर ते बिरेवाडी रस्ता 3.850 किलोमीटर लांबीसाठी 4 कोटी 81 लाख 57 हजार रुपये, शिंदोडी ते ठाकरवाडी रस्ता तीन किलोमीटर करता 4 कोटी 16 लाख 3 हजार रुपये, तासकरवाडी ते खंडेराया वाडी रस्ता 5.310 किलोमीटरसाठी 7 कोटी 76 लाख 31 हजार रुपये या कामांचा समावेश होता. एकूण 30.570 किलोमीटर लांबीसाठी 40 कोटी 73 लाख 81 हजार रुपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र 7 ऑगस्ट 2025 च्या नव्या अध्यादेशानुसार ही सर्व कामे रद्द करण्याचा शासनाकडून दुर्दैवी निर्णय घेण्यात आला आहे.
मागील आठ महिन्यांमध्ये नवीन सरकारमधून एक रुपयाचा निधी न आणता जुन्याच निधीवर उद्घाटनाचे कार्यक्रम करणाऱ्या नवीन लोकप्रतिनिधीने आपल्या मर्जीतील ठेकेदारांना सांभाळण्यासाठी हे सर्व कामे रद्द करून आणली आहेत. जेणेकरून ही जुनीच कामे पुन्हा नव्याने टेंडर करता येतील आणि आपल्या मर्जीतील ठेकेदारांना काम देता येईल असा हा डाव आहे. याचबरोबर मागील आठ महिन्यांपासून संगमनेर शहर व तालुक्यामध्ये वातावरण खराब करण्याचे काम सुरू झाले आहे.
यामुळे तालुक्यात नवीन लोकप्रतिनिधी विरोधात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून हा कुठला दडपशाहीचा प्रकार असा सवाल विचारला जात आहे. याचबरोबर असे दुर्दैवाचे राजकारण संगमनेर तालुक्यामध्ये कधीही नव्हते अशी भावना तालुक्यामध्ये निर्माण झाली आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंजूर केलेल्या या रस्त्यांची कामे रद्द झाल्याने डीग्रस, रणखांबवाडी, साकुर पठार, चिखली, जवळेकडलग, खरशिंदे, खांबा, मिर्जापुर, धांदरफळ खुर्द, पारेगाव खुर्द, तिगाव, साकुर, बिरवाडी, शिंदोडी, ठाकरवाडी, तासकरवाडी खंडेरायवाडी या गावांमधील नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून या सर्वांनी या दुर्दैवी घटनेचा निषेध केला आहे.
Breaking News: Road projects worth Rs 40 crore approved through efforts of former minister Balasaheb Thorat