Home संगमनेर संगमनेर: नगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्ताने ऐन थंडीत संगमनेरचं राजकीय वातावरण तापलं

संगमनेर: नगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्ताने ऐन थंडीत संगमनेरचं राजकीय वातावरण तापलं

Breaking News | Sangamner municipal election : संगमनेरचं वातावरण ऐन थंडीत तापलं; तांबेंच्या सौभाग्यवती, तर खताळांच्या भावजयीमध्ये थेट लढत, नाशिक पदवीधरचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी डॉ. मैथिली तांबे आणि एकनाथ शिंदे शिवसेना यांच्या भावजयी सुवर्णा खताळ-राहणे यांच्यात नगराध्यक्षपदासाठी थेट लढत होणार.

Sangamner municipal election 2025

संगमनेर: विधानसभा निवडणुकीत संगमनेर मतदारसंघातील निवडणूक राज्यात लक्षवेधी ठरली. बाळासाहेब थोरात यांच्याविरुद्ध अमोल खताळ यांनी बाजी मारली असली, तरी थोरात विखे पाटील यांच्यातील राजकीय संघर्षाने संगमनेर ढवळून निघालं.

आता नगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्ताने ऐन थंडीत संगमनेरचं राजकीय वातावरण तापलं आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे नाशिक पदवीधरचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी डॉ. मैथिली तांबे आणि एकनाथ शिंदे शिवसेना यांच्या भावजयी सुवर्णा खताळ-राहणे यांच्यात नगराध्यक्षपदासाठी थेट लढत होणार आहे.

संगमनेर) नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी राजकीय चित्र स्पष्ट झालं. महाविकास आघाडी पुरस्कृत ‘संगमनेर सेवा समिती’ने आपले सर्वच्या सर्व उमेदवार जाहीर करत विकासाचा एक ठोस आराखडा संगमनेरकरांसमोर ठेवला आहे.

तर दुसरीकडे, महायुतीनेही नगराध्यक्षपदासाठी आपला उमेदवार निश्चित करत महाविकास आघाडीच्या ‘संगमनेर सेवा समिती’ समोर आव्हान उभं केलं. या निवडणुकीतील नगराध्यक्षपदाची मुख्य लढत आता लक्षवेधी ठरली आहे. महाविकास आघाडीचे समर्थन असलेल्या ‘संगमनेर सेवा समिती’कडून नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी डॉ. मैथिली तांबे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

महायुतीकडून नगराध्यक्षपदासाठी आमदार अमोल खताळ यांच्या भावजयी सुवर्णा संदीप खताळ-राहणे यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. यामुळे संगमनेरमधील नगराध्यक्षपदाची मुख्य लढत स्पष्ट झाली असून, या दोन्ही आमदारांपैकी कोणाच्या पारड्यात संगमनेरकर आपले बहुमत टाकतात, हे तीन डिसेंबरला मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.

संगमनेर नगरपालिकेची निवडणूक महाविकास आघाडीने ‘संगमनेर सेवा समिती’च्या माध्यमातून लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीचे नेतृत्व स्वतः आमदार सत्यजित तांबे करत आहेत. नगराध्यक्षपदासाठी सुरुवातीपासूनच माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे किंवा डॉ. मैथिली तांबे यांचे नाव चर्चेत होते, अखेर डॉ. मैथिली तांबे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखालील संगमनेर सेवा समितीने नगराध्यक्षपदासह सर्वच्या सर्व 30 नगरसेवकपदाचे उमेदवार जाहीर केले आहेत, यामुळे त्यांनी निवडणुकीची तयारी पूर्ण केल्याचे चित्र आहे.

महायुतीकडून उमेदवारांच्या नावावर एकमत होताना दिसत नव्हते, त्यांचा अखेरपर्यंत गुंता कायम होता. महायुतीने केवळ नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर केले. मात्र नगरसेवकपदाच्या उमेदवारांची यादी अद्याप जाहीर केली नव्हती. दुसरीकडे, निवडणूक प्रक्रियेतून ऐनवेळी विखेपाटील पिता-पुत्रांनी माघार घेतल्याने भाजपची मोठी कोंडी झाल्याचे दिसले. नावे निश्चित करण्यासाठी नेमलेल्या सुकाणू समितीचाही फारसा प्रभाव दिसला नाही.

Breaking News: Sangamner municipal election 2025

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here