Home अहिल्यानगर शिर्डीच्या राजकारणात मोठा भूकंप, आरक्षण जाहीर

शिर्डीच्या राजकारणात मोठा भूकंप, आरक्षण जाहीर

Breaking News | Shirdi Election: नुकत्याच जाहीर झालेल्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीने अनेक मातब्बर नेत्यांना धक्का बसला आहे. हे पद अनुसूचित जाती महिला वर्गासाठी आरक्षित झाल्याने अनेक इच्छुक उमेदवारांच्या स्वप्नांवर पाणी फिरले.

Shirdi Election Big earthquake in Shirdi politics, reservation announced

शिर्डी : शिर्डी नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीचा बिगुल वाजला असून नुकत्याच जाहीर झालेल्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीने अनेक मातब्बर नेत्यांना धक्का बसला आहे. हे पद अनुसूचित जाती महिला वर्गासाठी आरक्षित झाल्याने अनेक इच्छुक उमेदवारांच्या स्वप्नांवर पाणी फिरले आहे. सोमवारी राज्यातील 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत जाहीर झाली. शिर्डी जे साईबाबांच्या समाधीमुळे जगभरात ओळखले जाते, तिथे नेहमीच स्थानिक राजकीय नेत्यांचा प्रभाव राहिला आहे. विशेषतः कोते, शेळके, गोंदकर, जगताप आणि गायके या कुटुंबांचे नगरपरिषदेवर वर्चस्व राहिले आहे. मागील एक वर्षापासून या कुटुंबांतील अनेक सदस्य नगराध्यक्षपदासाठी जोरदार तयारी करत होते. त्यांनी विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला.

गेल्या अनेक वर्षांपासून नगराध्यक्षपदाची संधी मिळावी म्हणून अनेक नेत्यांनी गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवासारख्या सणांमध्ये आर्थिक आणि सामाजिक मदत केली होती. अनेकांनी पक्षश्रेष्ठींना खुश ठेवण्यासाठी विधानसभा निवडणुकीत आपल्या प्रभागातून मताधिक्य मिळवण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र आरक्षण अनुसूचित जाती महिलेसाठी जाहीर झाल्याने सर्वसाधारण आणि ओबीसी प्रवर्गातील अनेक दावेदारांचा हिरमोड झाला आहे. एकीकडे अनेक नेत्यांचे स्वप्न भंगले असले, तरी दुसरीकडे अनुसूचित जाती समुदायाला न्याय मिळाल्याचे मतदारांनी बोलून दाखवले आहे. या आरक्षणामुळे या समाजातील घटकांच्या चेहर्‍यावर आनंद दिसून येत आहे.

या नव्या समीकरणामुळे आता राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मूळ भाजप कार्यकर्त्यांना नगराध्यक्षपदाची संधी देऊन भाजप आणि विखे यांच्यातील अंतर्गत वाद मिटवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर महायुतीकडून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉ. सुजय विखे पाटील तसेच महाविकास आघाडीकडून पक्षश्रेष्ठी कोणाला संधी देतात, याबाबत शिर्डीकरांना मोठी उत्सुकता आहे. बुधवारी 8 ऑक्टोबर रोजी प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर शिर्डी नगरपरिषदेच्या निवडणुकीला खर्‍या अर्थाने रंगत येणार आहे. त्यानंतरच कोणत्या प्रभागातून कोण उमेदवार उभा राहणार हे स्पष्ट होईल.

या आरक्षण सोडतीनंतर डॉ. सुजय विखे पाटील यांनी केलेले एक विधान चर्चेचा विषय बनले आहे. त्यांनी एका जाहीर कार्यक्रमात शिर्डी नगराध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जाती वर्गासाठी निघावे म्हणून साईबाबांना साकडे घातले असल्याचे म्हटले होते. असे झाल्यास लोणी ते शिर्डी पायी येऊन दर्शन घेणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. सोमवारी आरक्षण जाहीर झाल्यानंतर त्यांचे हे भाष्य खरे ठरले असून डॉ. विखे यांना साईबाबा पावल्याची चर्चा दिवसभर परिसरात रंगली होती.

Breaking News: Shirdi Election Big earthquake in Shirdi politics, reservation announced

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here