अहिल्यानगर: मोटार वाहन निरीक्षकासाठी लाच घेताना श्रीरामपूरच्या व्यक्तीला पकडले
Breaking News | Ahilyanagar Bribe Case: तक्रारदारांकडून तीन हजार रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.
अहिल्यानगर: येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील महिला मोटार वाहन निरीक्षक व त्यांना सहकार्य करणारा श्रीरामपूर येथील खासगी व्यक्तीविरूध्द छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. मोटार वाहन निरीक्षक (वर्ग 1) गीता भास्कर शेजवळ (रा. केडगाव, अहिल्यानगर) व खासगी व्यक्ती इस्माईल नवाब पठाण (वार्ड नंबर 6, अशोक पेट्रोलपंपासमोर, श्रीरामपूर) अशी त्यांची नावे आहेत.
दरम्यान, त्यांच्याविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पठाण याला तक्रारदारांकडून तीन हजार रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. तक्रारदाराने बुधवारी (24 सप्टेंबर) लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजीनगर येथे तक्रार दाखल केली होती. तक्रारदार यांचे ओव्हरलोड सिमेंटचे वाहन पाटस येथून अहिल्यानगर येथे सोडण्यासाठी तीन हजार रूपये लाच मागणी होत असल्याची माहिती त्यांनी दिली. या तक्रारीच्या पडताळणीत, खासगी इसम इस्माईल पठाण याने तक्रारदाराकडे तीन हजार रूपयांची लाचेची मागणी केली आणि ती रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली.
पठाण याने ही रक्कम चांदणी चौक, प्रादेशिक परिवहन कार्यालय, अहिल्यानगर येथे पंचासमक्ष स्वीकारली. या प्रकरणात मोटार वाहन निरीक्षक गीता शेजवळ यांनी लाच मागणीस प्रोत्साहन दिले असल्याचेही स्पष्ट झाले. त्यानंतर पथकाने कारवाई करताना पठाण यास रंगेहाथ पकडले. लाच स्वीकारण्याची संपूर्ण रक्कम पंचासमक्ष जप्त करण्यात आली.
पोलीस उपअधीक्षक राजीव तळेकर, पोलीस निरीक्षक संतोष तिगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार राजेंद्र सिनकर, दीपक इंगळे, प्रकाश घुमरे, सी. एन. बागुल यांनी ही कारवाई केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगर येथील महिला पोलीस निरीक्षक छाया देवरे करीत आहेत.
Breaking News: Shrirampur man caught taking bribe for motor vehicle inspector