Home अहिल्यानगर अहिल्यानगर: सीना नदीला पूर; कल्याण रस्त्यावरील वाहतूक दिवसभर बंद

अहिल्यानगर: सीना नदीला पूर; कल्याण रस्त्यावरील वाहतूक दिवसभर बंद

Breaking News | Ahilyanagar Rain Update: विविध भागात झालेल्या पावसामुळे सीना नदीला पूर आला. या पुराचे पाणी नदीपत्रातून बाहेर येत अक्राळ रुप धारण केले.

Sina river floods traffic on Kalyan road closed for the whole day

अहिल्यानगर:  रविवारी रात्री आणि सोमवारी सकाळी नगर शहरासह तालुक्याच्या विविध भागात झालेल्या पावसामुळे सीना नदीला पूर आला. या पुराचे पाणी नदीपत्रातून बाहेर येत अक्राळ रुप धारण केले. दरम्यान, कल्याण रोडवरील पुलाचे काम सुरू असल्याने या ठिकाणी असणारा छोठा पुल पुराच्या पाण्याखाली गेल्याने सोमवारी दिवसभर कल्याण रोडवरील वाहतूक ठप्प होती. यामुळे या मार्गावरून प्रवास करणार्‍या सर्व वाहनांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागला.

नगर शहरासह तालुक्यातील बहुतांश भागात गेल्या आठ दिवसांपासून पावसाची कमी अधिक प्रमाणात संततधार सुरू आहे. यामुळे सोमवारी सकाळी वाळकी, गुंडेगाव, देऊळगाव, खडकी, रुईछत्तीसी व परिसरात नद्या, ओढे, नाले ओसंडून वाहत असून शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे. या अतिवृष्टीमुळे शेकडो हेक्टरवरील शेती पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र समोर आले आहे. एकट्या गुंडेगावमध्ये 358 हेक्टर कांदा, 364 हेक्टर तुर, 150 हेक्टर कापूस, 27 हेक्टर सोयाबीन तसेच बाजरी, मका यांसारख्या पिकांवर पावसामुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. अशीच स्थिती बहुतांश गावांमध्ये आहे.शेतकर्‍यांनी हंगामभर खर्च करून घेतलेली पिके काही तासांच्या पावसामुळे पाण्याखाली गेल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे.

या गंभीर परिस्थितीची दखल घेत माजी उपसरपंच संतोष भापकर यांनी तातडीने तहसीलदारांकडे नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याची मागणी केली आहे. तसेच या संदर्भातील माहिती आ. विक्रमसिंह पाचपुते यांना देखील कळविण्यात आली आहे. यामुळे शासकीय यंत्रणेकडून गुंडेगाव परिसरातील शेती पिकांच्या नुकसानीसंदर्भात हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, लवकरच कृषी विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करून प्राथमिक माहिती गोळा करणार असून पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

शेतकरी वर्गाला शासनाकडून तातडीने मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शेतकर्‍यांच्या हाती आलेला हंगामाचा घास पावसाने हिरावून घेतल्याने गावागावात हताशतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नगर शहराजवळील सीना नदीला पूर आल्याने दिवसभर कल्याण रोडवरील वाहतूक ठप्प होती. दिवसभर या रस्त्यावर पूराचे पाणी असल्याने नागरिकांना काटवन खंडोबा, अरूणोदय गोशाळा या रस्त्याचा वापर करावा लागला.

Breaking News: Sina river floods traffic on Kalyan road closed for the whole day

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here