Home संगमनेर संगमनेरात गोवंश मांसाची तस्करी, एकास रंगेहाथ पकडले, 17 लाखांचा मुद्देमाल जप्त

संगमनेरात गोवंश मांसाची तस्करी, एकास रंगेहाथ पकडले, 17 लाखांचा मुद्देमाल जप्त

Breaking News | Sangamner Crime: पथकाने संगमनेर शहरातील रहेमतनगर परिसरात छापा टाकून गोवंश जातीचे मांस तस्करी करताना रंगेहाथ एका आरोपीला पकडले, तर गोमांसाचा मालक आणि एका वाहनाचा मालक असलेले दोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी. १७ लाख रुपयांचे गोमांस आणि दोन वाहने जप्त करण्यात आली.

smuggling one caught red-handed, goods worth Rs 17 lakh seized

संगमनेरः पोलीस उपाधीक्षकांच्या विशेष पथकाने संगमनेर शहरातील रहेमतनगर परिसरात छापा टाकून गोवंश जातीचे मांस तस्करी करताना रंगेहाथ एका आरोपीला पकडले, तर गोमांसाचा मालक आणि एका वाहनाचा मालक असलेले दोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. या कारवाईत सुमारे १७ लाख रुपयांचे गोमांस आणि दोन वाहने जप्त करण्यात आली आहेत. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेतील कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी (११ ऑक्टोंबर) सकाळी ०७.०५ वाजता पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, संगमनेर शहरातील मौलाना आझाद मंगल कार्यालयाच्या पाठीमागे, रहेमतनगर येथे मोहंमद अतीक रफीक कुरेशी ऊर्फ सोन्या (रा. बुद्ध विहारचे बाजूला नाशिक पुणे हायवे, संगमनेर) याच्या मालकीच्या दोन वाहनांमध्ये गोवंश मांस भरलेले आहे. खात्रीशीर बातमी मिळाल्याने डीवायएसपी सोनवणे यांनी पथकातील पोलीस कॉन्स्टेबल राहुल कैलास सारबंदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय चिंधु मेंगाळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल रघुनाथ कडलग, पोलीस नाईक बापुसाहेब सुर्यभान हांडे यांना घटनास्थळी जाऊन खात्री करण्यास सांगितले.

पोलीस पथकाने दोन पंचांना सोबत घेऊन खाजगी वाहनाने सकाळी ०८.५० वाजता रहेमतनगर येथील नमूद ठिकाणी छापा टाकला. यावेळी दोन वाहने उभी दिसली आणि तीन इसम उपस्थित होते. पोलिसांना पाहताच तिघेही पळू लागले. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून तिघांपैकी एका आरोपीला पकडले. पकडलेल्या इसमाचे नाव अल्ताफ सलीम शेख (रा. नाटकी, संगमनेर) असे आहे. त्याने पळून गेलेल्या इतर दोन आरोपींची नावे मोहंमद अतीक रफीक कुरेशी उर्फ सोन्या आणि अरबाज सादिक शेख (रा. रहेमतनगर, संगमनेर) अशी सांगितली.

पथकातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तपासणी केली असता, महिंद्रा पिकअप (क्र. एम.एच. १७ बी. वाय. ८५८०) आणि टाटा इन्ट्रा (क्र. एम.एच. ४८ सी.बी. ८८२१) या दोन वाहनांमध्ये गोवंश जातीचे कत्तल केलेले मांस भरलेले आढळले. पोलीस पथकाने केलेल्या कारवाईमध्ये पकडलेला आरोपी अल्ताफ सलीम शेख याची मालकी असलेली सुमारे ५,५०,०००/- रुपये किंमतीची पांढऱ्या रंगाची टाटा इन्ट्रा कंपनीची गाडी (क्र. एम.एच. ४८ सी.बी. ८८२१) जप्त करण्यात आली. या गाडीमध्ये अंदाजे २,००,०००/- रुपये किंमतीचे (१००० किलो, रु. २००/-प्रति किलोप्रमाणे) गोमांस मिळून आले.

तसेच, पळून गेलेला आरोपी अरबाज सादिक शेख याची मालकी असलेली सुमारे ६,५०,०००/-रुपये किंमतीची पांढऱ्या रंगाची महिंद्रा कंपनीची पिकअप गाडी (क्र. एम.एच. १७ बी.वाय. ८५८०) देखील जप्त करण्यात आली. या पिकअप गाडीत अंदाजे ३,००,०००/- रुपये किंमतीचे (१५०० किलो, रु. २००/- प्रति किलोप्रमाणे) गोमांस मिळून आले.

पकडलेल्या आरोपी अल्ताफ सलीम शेख याने दोन्ही वाहनांमधील एकूण २,५०० किलो गोमांस पळून गेलेला आरोपी मोहंमद अतीक कुरेशी उर्फ सोन्या याचे असल्याचे सांगितले आहे.

या घटनेचा पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय चिंधु मेंगाळ यांनी दोन पंचांसमक्ष ‘ई साक्ष’ अॅपद्वारे पंचनामा केला. जप्त केलेल्या गोमांसाचे नमुने रासायनिक तपासणीसाठी पशुवैद्यकीय अधिकारी, संगमनेर यांच्यामार्फत घेण्यात आले आहेत.

तर पोलीस कॉन्स्टेबल राहुल कैलास सारबंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पकडलेला आरोपी अल्ताफ सलीम शेख आणि पळून गेलेले आरोपी मोहंमद अतीक रफीक कुरेशी उर्फ सोन्या व अरबाज सादिक शेख यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २७१, ३२५, ३(५) सह, महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम, १९९५ (सुधारित २०१५) चे कलम ५, ५ (क), ९, ९ (अ) प्रमाणे संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.

Breaking News: smuggling one caught red-handed, goods worth Rs 17 lakh seized

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here