अहिल्यानगर: लग्नाचे आमिष दाखवून शिक्षिकेची 22 लाखांची फसवणूक
Breaking News | Ahilyanagar Crime: लग्न करण्याचे आमिष दाखवून शिक्षिकेची सुमारे 22 लाख रूपये कर्ज काढून घेत फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस.
अहिल्यानगर: लग्न करण्याचे आमिष दाखवून शिक्षिकेची सुमारे 22 लाख रूपये कर्ज काढून घेत फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सावेडी उपनगरात राहत असलेल्या व राहुरी तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका असलेल्या 42 वर्षीय पीडितेने सोमवारी (22 सप्टेंबर) रात्री दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षय रामदास काळे, सविता रामदास काळे व सुप्रिया रामदास काळे (सर्व रा. काळेवाडी, अस्तगाव, ता. पारनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. फिर्यादीने पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतला आहे. सन 2019 मध्ये नगर-मनमाड रस्त्यावरील येवले अमृततुल्य चहाच्या दुकानावर त्यांची ओळख दुकान व्यवस्थापक अक्षय काळे याच्याशी झाली. त्यानंतर दोघांत फोनवर बोलणे सुरू झाले. फिर्यादीने आपले वैवाहिक जीवन सांगूनही अक्षय व त्याच्या कुटुंबीयांनी लग्नासाठी संमती दिल्याचे दाखवून विश्वास संपादन केला.
दरम्यान, त्यानंतर वेगवेगळ्या कारणांनी यामध्ये कर्जफेड, दागिने खरेदी व दुकान घेण्यासाठी अक्षयने वेळोवेळी फिर्यादीकडून रोख तसेच ऑनलाईन मोठी रक्कम घेतली. फिर्यादीने 1 तोळ्याची सोन्याची चैन, 50 हजार रूपये रोख, त्यानंतर 45 हजार रूपये, तसेच प्राथमिक शिक्षक बँक, कोपरगाव येथून सुमारे 22 लाख रूपये कर्ज काढून अक्षय काळे, त्याची आई सविता काळे व बहीण सुप्रिया काळे यांच्या खात्यावर पाठविले. अक्षय व त्याच्या कुटुंबाने ही रक्कम वापरून सप्टेंबर 2020 मध्ये येवले अमृततुल्य चहा दुकान, सावेडी शाखा विकत घेतली. मात्र ऑगस्ट 2024 मध्ये ते दुकान पीडितेला न सांगता अमोल हुंबे या व्यक्तीला विकून टाकण्यात आले. शिवाय या रकमेतील पैशांतून नवीन दुचाकीही घेतल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
दरम्यान, लग्नाचे खोटे आश्वासन देऊन पैसे घेऊन वेळोवेळी संशयित आरोपींकडून आणखी पैशांची मागणी करण्यात आली. महिन्याला 40 हजार रूपये देण्यास भाग पाडण्यात आले, असा आरोपही फिर्यादीने केला आहे. या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
Breaking News: Teacher cheated of Rs 22 lakhs on the pretext of marriage