नागरिकांनी सावधान! रात्रभर मुसळधार, नदी धोका पातळीवर
Breaking News | Rain Update Flood Alert: रात्रभर मुसळधार पाऊस कोसळत आहे. काही धरणांच्या विसर्गात मोठी वाढ झाल्यामुळे दारणा, कादवा नदीला पूरस्थिती निर्माण झाली. घराची भिंत कोसळून वृद्ध महिलेचा मृत्यू.
नाशिक : जिल्ह्यातील अनेक भागात रात्रभर मुसळधार पाऊस कोसळत आहे. काही धरणांच्या विसर्गात मोठी वाढ झाल्यामुळे दारणा, कादवा नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे. शहरात १० तासांत ५० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. बागलाण तालुक्यात घराची भिंत कोसळून वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. एक महिला जखमी झाली. मालेगाव तालुक्यात १६ वर्षीय तरुण मेंढपाळासह त्याच्या मेंढ्यांवर वीज पडली. यामध्ये १० मेंढ्या मयत झाल्या असून मेंढपाळ गंभीर जखमी झाला.
शनिवारी सायंकाळपासून अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. रविवारी सकाळपर्यंत त्याचा जोर कायम होता. १८ धरणांमधून विसर्ग करावा लागला. दारणा, पालखेड, कडवा व नांदूरमध्यमेश्वर धरणांच्या विसर्गात मोठी वाढ करण्यात आली. कादवा व दारणा नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक शहरात रात्री अवघ्या तीन तासांत ३१.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. रात्रभर पाऊस कोसळत होता. गंगापूरमधील विसर्ग आणि शहरातील पाऊस यामुळे गोदावरी दुथडी भरून वहात आहे.
गोदामाई दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. शिवाय दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आले आहे.
गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या भागात तसेच कश्यपी आणि गौतमी गोदावरी धरण पाणलोट क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु राहिल्याने दोन्ही धरणांमधून सोडण्यात येणारे पाणी गंगापूर धरणात येत असल्याने गंगापूर धरणातून विसर्ग करणे भाग पडले आहे. गंगापूर धरणातून ६५१३ क्युसेक विसर्ग सुरु होता. त्यात दुपारी एक वाजता २१७१ क्युसेकने वाढ करण्यात आली. त्यामुळे एकूण विसर्ग सद्यस्थितीत ८६८४ क्युसेक झाला आहे. रामकुंडाजवळील अहिल्यादेवी होळकर पूल येथे दुपारी १८४७.५० फुट पाणी पातळी झाली. या ठिकाणाहून १३०४५.७२ क्युसेकने विसर्ग करण्यात येत होता.
रविवारी सकाळी जिल्ह्यातील १८ धरणांमधून विसर्ग सुरू असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली. दारणा १२ हजार १६७, पालखेड १२ हजार १२४ आणि कडवा धरणाचा विसर्ग ६७५२ क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला आहे. गंगापूर धरणातून ४८८६, वालदेवी ८१४, आळंदी २४३, भावली २९०, भाम ५१०, वाघाड ९३०, नांदूरमध्यमेश्वर ३१२८३, करंजवण ६६७५, तिसगाव ७८, गौतमी गोदावरी १२९६, कश्यपी ४८०, ओझरखेड ७०० आणि पुणेगाव धरणातून १९२० क्युसेकचा विसर्ग करण्यात आला आहे.
Breaking News: Torrential rain overnight, river at danger level