Home अकोले अकोलेत आदिवासी दिनाला गालबोट! पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी

अकोलेत आदिवासी दिनाला गालबोट! पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी

Breaking News| Eknath Shinde in Akole: आमदार लहामटे यांनी याचा हिशोब चुकता करावा लागेल असा थेट इशाराच पोलीस प्रशासनाला दिला.

Tribal Day celebrated in Akole! Police and activists clash

अकोले: तालुक्यात जागतिक आदिवासी दिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. मात्र याच दिनाला शेवटी गालबोट लागले. आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या नेतृत्वाखाली अकोले शहरात निघालेल्या मिरवणुकीत रस्त्यावरील गर्दी उपमुख्यमंत्र्यांच्या निर्गमनापूर्वी कमी करण्याच्या प्रयत्नात असणार्‍या पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी झाली. त्यातून पोलिसांना कार्यकर्त्यांवर लाठीहल्ला करण्याची वेळ आली. याबाबत बोलताना आमदार लहामटे यांनी याचा हिशोब चुकता करावा लागेल असा थेट इशाराच पोलीस प्रशासनाला दिला. आता या घटनेचे तीव्र पडसाद राजकीय क्षेत्रात उमटू लागले आहे.

आमदार रोहित पवार यांनी अजितदादांच्या आमदाराने काढलेल्या मिरवणुकीत गृह विभागाकडून लाठीहल्ला केला जातो याचा अर्थ सरकारमधील तीन पक्ष एकमेकांवर कुरघोड्या करण्याचा प्रयत्न आहेत हे यानिमित्ताने स्पष्ट होतं, अशी टीका केली आहे. तर याच पक्षाचे अकोल्यातील युवा नेते अमित भांगरे यांनी सर्व आदिवासी बांधवांचा हा अभिमानाचा दिवस काही जणांनी आपल्या राजकीय पोरकटपणामुळे कलंकित केला असल्याचा टोला नाव न घेता आमदार लहामटे यांना लगावला आहे.

दरम्यान, आदिवासी दिनानिमित्त महायुतीचे घटक पक्ष असणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व शिवसेना (शिंदे गट) या पक्षांतर्फे स्वतंत्र कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत बाजारतळावर शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात शिंदे यांचे भाषण सुरू असतानाच आमदार लहामटे यांच्या नेतृत्वाखालील मिरवणूक बाजारतळालगतच्या रस्त्यावरून जात होती. यावेळी डीजेचा दणदणाट स्पष्टपणे ऐकू येत होता. मात्र, नामदार शिंदे यांनी आपला भाऊच आहे म्हणत त्याकडे दुर्लक्ष केले व आपले भाषण सुरू ठेवले. यानंतर अंबड येथे गेलेल्या उपमुख्यमंत्र्यांचा ताफा हेलिपॅडवर जाण्यासाठी मिरवणूक सुरू असलेल्या रस्त्याने जाणार होता. त्यासाठी पोलीस प्रशासन रस्ता मोकळा करण्यासाठी प्रयत्न करत असताना कार्यकर्ते व पोलिसांत बाचाबाची झाली. त्याचे पर्यावसन लाठीहल्ल्यामध्ये झाले. यावेळी तेथे चांगलाच राडा झाला.

या घटनेनंतर बसस्थानक परिसरात झालेल्या सभेत आमदार लहामटे यांनी अत्यंत आक्रमक भाषण करीत प्रशासनाला सुनावले. आदिवासी या देशाचे मूळ मालक आहेत. त्यामुळे आम्हाला कोणी अंगावर घ्यायचा प्रयत्न करू नका. वाघाच्या शेपटीला मागे ओढणारी आमची जात आहे. आदिवासींना भीती नाही कोणाची. तुमच्या प्रशासनाने लाठीहल्ला केला पण आम्ही संयमाने घेतले. कारण आम्हाला माहीत आहे एवढी मोठी संख्या आहे त्यात काही पण होऊ शकते. तुम्ही चुकले पण आम्ही चूकणार नाही. पण याचा हिशोब होणार या शब्दांत त्यांनी थेट इशारा दिला.

याबाबत अकोले पोलिसांत कोणत्याही प्रकारच्या तक्रारीची नोंद झाली नसल्याचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी सार्वमतशी बोलताना सांगितले. इतर राजकीय पक्षांच्या नेते व कार्यकर्त्यांकडून झालेल्या या प्रकाराबद्दल उलटसुलट प्रतिक्रिया उमटू राहिल्या आहेत. यावरून राज्यात जरी महायुतीचे सरकार असले तरी अकोले तालुक्यात मात्र त्यांच्याच मित्रपक्षांत अंतर्गत कुरघोड्या मोठ्या प्रमाणावर सुरू असल्यामुळे विरोधकांना आयती टीकेची संधी उपलब्ध झाली आहे.

Breaking News: Tribal Day celebrated in Akole! Police and activists clash

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here