अहिल्यानगर: ढगफुटीसदृश्य पावसामुळे आलेल्या पुरात दोन जण वाहून गेले, आभाळ फाटलं
Breaking News | Ahilyanagar rain Update: आपत्तीमुळे तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला, तर शेतजमिनी, घरे, दुकाने, जनावरे आणि रस्त्यांचे कोट्यावधींचे नुकसान.
पाथर्डी: पाथर्डी तालुक्यात सोमवारी झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे आलेल्या पुरात दोन जण वाहून गेले. शेकडो नागरिकांना पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे. या आपत्तीमुळे तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला, तर शेतजमिनी, घरे, दुकाने, जनावरे आणि रस्त्यांचे कोट्यावधींचे नुकसान झाले आहे. टाकळीमानूर येथील गणपत बर्डे आणि माणिकदौंडी परिसरातील लांडकवाडी येथील राजू बजरंग साळुंके हे दोघे पुराच्या पाण्यात वाहून गेले. करंजी, जवखेडे, हनुमानटाकळी येथील 127 नागरिकांना एनडीआरएफ व अग्निशमन दलाच्या जवानांनी पुरातून बाहेर काढले.
याशिवाय कासार पिंपळगाव, मढी, शिरापूर, निवडुंगे, शिरसाटवाडी, माणिकदौंडी, मानेवाडी, मोहटे, कारेगाव, वाळुंज यांसह नदीकाठच्या गावांतील नागरिकांना स्थानिक तरुणांनी जेसीबी, मानवी साखळी व दोरीच्या साहाय्याने जीव धोक्यात घालून वाचवले. अतिवृष्टीमुळे तालुक्यातील मोठ्या प्रमाणात रस्ते वाहून गेले. कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग, बारामती-संभाजीनगर राज्य महामार्ग व पाथर्डी-बीड राज्य महामार्गावरील पुलांवरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती.पहाटेपासून सकाळी दहापर्यंत सर्व वाहतूक ठप्प राहिली.अजूनही बारामती-संभाजीनगर महामार्ग बंद आहे. अनेक गावांचा पाथर्डीशी संपर्क पूर्णपणे तुटल्याने नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागले.
पुराच्या पाण्यामुळे शेतकर्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. बाजरी, कापूस, तूर, मूग यांसह अनेक पिके वाहून गेली. चिंचपूर इजदे येथील दुकाने व घरे पाण्याने वाहून गेली, उद्धव खेडकर यांच्या दुकानात लाखो रुपयांचे खत व इतर मालाचे नुकसान झाले. मानेवाडी येथील बंधारा फुटल्याने उभ्या पिकांचे नुकसान झाले. महादेव मरकड यांच्या ड्रॅगन फ्रूट बागेचे पूर्णतः नुकसान झाले. तिनखडी, चिंचपूर इजदे, जवखेडे खालसा, तिसगाव येथील स्मशानभूमी वाहून गेल्या. अनेक जनावरे, वाहने, वीज खांब व ट्रान्सफॉर्मर पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे.
पाथर्डी शहरही पाण्याखाली गेले. नवीन बसस्थानक परिसरात तळ्यासारखे पाणी साचले. तळघरातील दुकाने पाण्याखाली गेली. बिबे आंबा तलावाच्या खालील वस्त्यांतील लोकांना बाहेर काढण्यात आले. नागरिकांनी तलाव फुटण्याची भीती व्यक्त केली आहे. शहरातील रस्त्यांवर जीसीबीच्या सहाय्याने पाण्याला वाट मोकळी करून देण्याचे काम करण्यात आले. आपत्ती निवारणासाठी प्रशासन, पोलिस, महसूल यंत्रणा, एनडीआरएफ तसेच लोकप्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले. आमदार मोनिका राजळे, आमदार शिवाजी कर्डिले व आमदार शिवाजीराव गर्जे यांनी तातडीने मदतकार्य गतीने करण्याच्या सूचना दिल्या. खासदार निलेश लंके यांनीही पूर परिस्थितीबाबत प्रशासनाला सूचना केल्या. केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अॅड. प्रताप ढाकणे यांनी नुकसानग्रस्त गावांना भेट देऊन पंचनामे करण्याची मागणी केली.
सरपंच, ग्रामसेवक व स्थानिक कार्यकर्त्यांनी तर जीव धोक्यात घालून नागरिकांना वाचवले. बारामती ते छत्रपती संभाजीनगर या राज्य महामार्गावरील शिरसाटवाडी येथील पुल निकामी होऊन वाहतुकीला त्याचा फटका बसला आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत पावसाचा जोर कमी अधिक प्रमाणात सुरू होता. त्यानंतर हळूहळू जन जीवन पूर्वपदावर येऊ लागले. मात्र सायंकाळपर्यंत पुरात अडकलेल्या लोकांना काढण्याचे काम सुरू होते. दरम्यान, प्रशासनाने नदीकाठच्या वस्तीवरील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. काही ठिकाणी लोकांना स्थलांतरित करून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे. वीजपुरवठा बंद झाल्याने अनेक गावात अंधार पसरला आहे.
वाहतूक ठप्प, शेतीचे नुकसान, घरे व दुकाने पाण्याखाली जाणे, स्मशानभूमी वाहून जाणे, जनावरे व वाहने पुरात वाहून जाणे या सगळ्या घटनांनी पाथर्डी तालुका हादरून गेला आहे. गेल्या पन्नास वर्षांत एवढा पाऊस कधी पाहिला नाही असे अनेक नागरिकांनी सांगितले. प्रांत अधिकारी प्रसाद मते, तहसीलदार उद्धव नाईक, पोलीस निरीक्षक विलास पुजारी, लोका कृषी अधिकारी महादेव लोंढे यांच्यासह विविध विभागाचे प्रतिनिधी यांच्याकडून मदत कार्य सुरू होते.
Breaking News: Two people were swept away in floods caused by cloudburst rains, the sky was torn apart